बॉलिवूडमध्ये १९८० ते १९९० चा कालावधी गाजवलेली आघाडीची अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टने झाला. तिच्या मृत्यूवर तिचा दीर संजय कपूर याने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ‘खलीज टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, श्रीदेवीच्या अचानक झालेल्या मृत्यूने संपूर्ण कपूर परिवार अजूनही धक्क्यात आहे. अचानक असे काही होईल असे आमच्यातील कोणालाच वाटले नव्हते. हा धक्का आमच्या कुटुंबासाठी अतिशय मोठा आहे, कारण श्रीदेवीला याआधी कधीच अशाप्रकारचा हृदयाचा आजार नव्हता. वयाच्या ५४ व्या वर्षी हृदयाच्या झटक्याने त्यांचे झालेले निधन सिनेसृष्टीला आणि रसिकांना चटका लावून जाणारेच आहे अशी भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.

दुबईमध्ये पुतण्याच्या लग्नासाठी गेलेली असताना कार्डिअॅक अरेस्टमुळे तिचा मृत्यू झाला. यावेळी तिचा पती प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक बोनी कपूर तसेच धाकटी मुलगी खूशी कपूर सोबत होती. या लग्नसमारंभातील काही फोटो सोशल मीडियावर आले त्यामध्ये श्रीदेवी व्यवस्थित असल्याचे दिसत आहे. मात्र अचानक आलेल्या कार्डिअॅक अरेस्टमुळे काळाने तिच्यावर घाला घातला असे म्हणता येईल.

हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनय आणि नृत्यकौशल्याने श्रीदेवी यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. अभिनेत्यांच्या चलतीच्या काळात स्वतःचे वेगळे स्थान टिकवूनही ठेवले. १९९७ मध्ये आलेल्या जुदाई या सिनेमानंतर त्यांनी जवळपास १२ ते १५ वर्षे ब्रेक घेतला. २०१२ मध्ये आलेल्या इंग्लिश विंग्लिश या सिनेमातून त्यांनी पुन्हा एकदा सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. हा सिनेमा समीक्षक आणि प्रेक्षक यांना आवडला. त्यानंतर आलेल्या मॉम या सिनेमानेही लोकांची मने जिंकली. झिरो या शाहरुखच्या आगामी सिनेमातही श्रीदेवी काम करत होत्या. मात्र शनिवारी त्या दुबईला गेल्या असताना त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना अचानक कार्डिअॅक अरेस्ट आला. त्यानंतर त्यांना रूग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. आता आज उशिरा त्यांचे पार्थिव चार्टर्ड प्लेनने मुंबईत आणले जाईल आणि उद्या म्हणजेच सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे.