ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि त्यांच्या जोडीला ह्रषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव या तरूण कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या ‘पोष्टर बॉईज’ चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून सहा दिवसांत दीड कोटींपेक्षा जास्त कमाई केली. चित्रपटाला राज्यभरात विविध स्तरांतून उत्तम प्रतिसाद मिळाला असून हा चित्रपट हिंदीत करावा, अशाप्रकारची मागणी होत होती. त्यामुळे ‘पोष्टर बॉईज’चा हिंदीत रिमेक करणार असल्याचे चित्रपटाचा निर्माता श्रेयस तळपदे याने सांगितले. ‘पोष्टर बॉईज’ला मिळालेला प्रतिसाद थक्क करणारा असल्याचे श्रेयसने सांगितले. आम्हाला संपूर्ण कुटुंबाला पाहता येईल असा मनोरंजक आणि चांगला चित्रपट बनवायचा होता. आम्ही प्रामाणिकपणे एक निखळ विनोदी चित्रपट लोकांना द्यायचा प्रयत्न केला. ‘पोष्टर बॉईज’ पाहिल्यानंतर बॉलिवूडमधील माझे सहकारी आणि मित्रमंडळींनी हा चित्रपट हिंदीत बनवला पाहिजे, असे सुचवले. चित्रपटाला मिळालेले यश पाहून हिंदीत हा चित्रपट आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे श्रेयसने सांगितले. मात्र, हिंदीत हेच कलाकार असतील की अन्य कलाकार याविषयी आत्ताच बोलणे योग्य होणार नाही, असेही त्याने म्हटले आहे.
हिंदी चित्रपटात साजेल असे कथानक, कलाकार असे योग्य ते बदल करून त्याचा रिमेक केला जाईल, असे त्याने सांगितले. राज्यभरात १६७ चित्रपटगृहांमधून प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सहा दिवसांत कोटीचा आकडा पार केला आहे. चित्रपटाच्या प्रसिध्दीवर घेतलेली मेहनत फळाला आल्याचे श्रेयसने सांगितले.