सध्या संपूर्ण जगात करोना व्हायरसचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चालला असल्याचे दिसत आहे. भारतात आणि भारताबाहेर देखील करोनाचा संसर्ग अनेक कलाकारांना झाल्याचे समोर आले. आता बॉलिवूड अभिनेत्री श्रिया सरनच्या पतीला देखील करोनाची लक्षणे जाणत असल्याचे समोर आले आहे.
सध्या श्रिया स्पेनमध्ये राहत आहे. तिने एका मुलाखतीमध्ये तिच्या पतीला करोनाची लक्षणे जाणवत असल्याचे सांगितले. ‘मी गेल्या एक महिन्यापासून बर्सेलोनामध्ये राहत आहे. करोना व्हायरसमुळे येथे सर्व काही बदलले आहे. आम्ही १३ मार्च रोजी लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा सगळीकडे फिरलो पण कोणतेच हॉटेल उघडे नव्हते’ असे श्रियाने म्हटले.
त्यानंतर काही दिवसांनंतर माझा पती Andreiला करोनाची लक्षणे जाणवू लागली. त्याला खोकला आणि ताप आल्यासारखे जाणवत होते. लगेच आम्ही दोघे हॉस्पिटलमध्ये गेलो. पण तेथे डॉक्टरांनी आम्हाला घरी जाण्याची विनंती केली. त्यांनी मला सांगितले की तुझ्या पतीला करोना व्हायरसचा संसर्ग झाला नसला तर हॉस्पिटलमध्ये आल्यामुळे तो होऊ शकतो. डॉक्टरांचा सल्ला घेऊन आम्ही हॉस्पिटलमधून घरी आले. त्यानंतर Andreiने घरातच स्वत:चे विलगीकरण करुन घेतले असल्याचे तिने सांगितले.
श्रियाचा पती आता एकदम ठिक आहे. श्रियाला आपल्या कुटुंबीयांची आठवण येत असून तिने भारतात परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.