शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या चर्चा त्यांनी अभिनेत्री कंगना रणौतवर केलेल्या टीकेमुळे सुरु झाल्या होत्या. त्यामुळे प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरानं ‘शट अप या कुणाल’ पॉडकास्टच्या दुसऱ्या सत्राची सुरूवात संजय राऊत यांच्या मुलाखतीनं करण्याची इच्छा व्यक्त केली होती. कुणालची ही इच्छा पूर्ण झाली आहे. नुकताच संजय राऊत यांनी कुणालसोबतचा फोटो ट्विट केला आहे.

नुकताच संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर कुणाल कामरासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी आज कुणाल कामराला भेटलो असे कॅप्शन दिले आहे. संजय राऊत आणि कुणाल कामराचा एकत्र फोटो पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

शिवसेनेची भूमिका मांडण्यामुळे सातत्याने चर्चेत राहणाऱ्या खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेण्यासंदर्भात कुणाल कामराने एक ट्विट केले होते.  “संजय राऊत सरांनी ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी ते पुन्हा सुरु करेन. अन्यथा काही शक्यता नाही,” असे कुणाल कामरा म्हणाला होता.

कुणाल कामराच्या या शोमध्ये आतापर्यंत काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या व सध्याच्या शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, जेएनयू विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि उमर खलिद, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी, गीतकार जावेद अख्तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, सचिन पायलट यांसह अनेक मोठी मंडळी सहभागी झालेली आहेत.