एके काळचा प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य आताच्या घडीला त्याच्या गाण्यांपेक्षा इतर कारणांसाठी चर्चेत आहे. सध्या त्याला गाजवणारे साधन म्हणजे त्याची ट्विरवरची टिवटिव. यापूर्वीही अनेकदा गायक अभिजीत ट्विटरवरील त्याच्या आक्षेपार्ह लेखणीसाठी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण हीच चूक पुन्हा करत आता ही टिवटिव त्याच्या अंगाशी आली आहे.
इन्फोसिसच्या एस्. स्वाथीच्या हत्येप्रकरणी ट्विट करत अभिजीतने ‘हे लव जिहादचे काम असून आरोपी मुसलमान आहे’ असा दावा केला आहे. त्याच्या या ट्विटवरुन ‘अभिजीत पाकिस्तानी गायकांवर जळत आहे’ या आशयाचे ट्विट पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी केले. तसेच, अभिजीत धार्मिक तेढ निर्माण करुन कायदा-सुव्यवस्थेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ट्विटही त्यांनी केले. यावर संतापलेल्या अभिजीतने महिला पत्रकारावर अत्यंत वाईट शब्दात टीकाटीप्पणी केली. संतापलेल्या अभिजीतने ‘निर्लज्ज म्हातारे’ अशा शब्दात स्वातींवर गरळ ओकली. अभिजीतने बरीच आक्षेपार्ह विधाने केल्यामुळे ट्विटर विश्वातून त्याच्यावर टीका होत असून त्याला अटक व्हावी अशी मागणी केली जात आहे.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत सायबर क्राईम विभागाकडे तक्रार नोंदवण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे जवळच्या पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्लाही दिला आहे.