|| रेश्मा राईकवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परिस्थितीनुरूप माणसाचे स्वभाव बदलतात, त्यांचं वागणं बदलतं. ज्या व्यक्तीवर आपलं अफाट प्रेम आहे, त्याच व्यक्तीकडून नाकारले गेल्यानंतर, त्याच्याकडून फसवणूक झाल्यानंतर मनात उठणारा कल्लोळ कु ठल्याही संघर्षांपर्यंत जाऊन पोहोचतो. टोकाचं प्रेम आणि त्यातून उफाळणारा टोकाचा राग हा ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटाचा कथाविषय असेल अशी आपली भावना होते. मात्र नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली विनिल मॅथ्यू दिग्दर्शित ही सणकी प्रेमकथा लव्ह, सेक्स, धोका पद्धतीने पुढे सरकते. एका वळणावर पुन्हा उदात्त प्रेमकथेचं रूप धारण करणाऱ्या या चित्रपटात काही चांगल्या जागाही आहेत हे दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही.

‘मनमर्जिया’ चित्रपटाने नावारूपाला आलेल्या कनिका धिल्लाँ या लेखिके नेच ‘हसीन दिलरुबा’ची कथा लिहिली आहे. कनिकाच्या कथानायिका या आजच्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आहेत. लग्न, जोडीदार, कु टुंब याच्याबरोबरीने आपल्या लैंगिक सुखाच्या अपेक्षांबाबतही त्या तितक्याच थेट व्यक्त होतात. या चित्रपटाची रानीही त्याला अपवाद नाही. दिल्लीतील उच्चभ्रू वस्तीत लहानाची मोठी झालेल्या रानीला उंचपुरा, देखणा, प्रेमाच्या बाबतीत आक्रमक असलेला असा जोडीदार हवा आहे. खून आणि त्याअनुषंगाने येणाऱ्या गुन्हेगारी कथा-कादंबऱ्यांचा प्रभाव तिच्यावर आहे. (हे अर्थातच पुढे पाहणाऱ्यांचा गोंधळ वाढावा यासाठी) तर प्रत्यक्षात या सुंदर रानीच्या वाटय़ाला येतो तो बारीक चणीचा, शांत, सरळमार्गी, काहीसा लाजाळू असा इंजिनीअर रिशू.. या रिशूशी लग्न करून रानी थेट दिल्लीवरून हरिद्वारनजीकच्या ज्वालापूर गावातील घरात येते. या घराला अपेक्षा आहे ती सुंदर, सुशील आणि सर्वगुणसंपन्न अशा सुनेची. रिशूच्या मनातील जोडीदाराची प्रतिमाही यापेक्षा वेगळी नाही. तरीही पाहताक्षणी रानीच्या प्रेमात पडलेला रिशू तिच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. पदरी पडलं आहे त्याच्याशी जमवून घेण्याचा प्रयत्न रानीही करते. पण सुरुवातीलाच विसंवादाची ठिणगी पडलेली ही प्रेमकथा सावरायच्या आधीच त्यात आणखी एक तिसरा धागा नीलच्या रूपाने दाखल होतो. नीलच्या येण्याने रानीचं त्याच्याकडे आकर्षित होणं जसं साहजिक आहे, तसं त्यामुळे रिशू आणि रानीच्या प्रेमकथेचा विस्फोट होणं हेही अनुषंगाने आलंच. हा कथाभाग त्याच पद्धतीने पुढे नेताना एका वळणावर कथा पूर्णपणे बदलते.

सुरुवातीपासून वास्तवाचं बोट धरून पुढे जाणारी कथा अचानक डोक्यात सणक जाऊन चित्रविचित्र वागायला लागणाऱ्या माणसासारखी अवास्तव भरक टत राहते. बरं या कथेत रानी आणि रिशूचे आई-वडील हे फक्त मध्ये मध्ये संस्कारांची पिपाणी वाजवण्यापुरते डोकावून जातात. त्यापलीकडे त्यांना काही कामच नाही जणू.. जेव्हा या घरात भयंकर काही घडू लागतं तेव्हा ही मंडळी बाहेर असतात. पोलिसांना सामोरे जाणारी रानी घरात परतल्यानंतरही रिशूच्या आई-वडिलांना हे काय चाललं आहे किं वा काय घडून गेलं आहे, याबद्दल कु ठलेही प्रश्न पडताना दिसत नाहीत. चित्रपटाच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये सगळी उलथापालथ घडते. अर्थात, तोवर काय घडून गेलं असेल याची प्रेक्षकांना पुरेशी कल्पना आलेली असते, त्यामुळे शेवटचा अति आणि रक्तरंजित असा उदात्त प्रेमाचा आविष्कार हा खोटा वाटतो. त्याच्याशी काही म्हटल्या जोडून घेता येत नाही. त्यातल्या त्यात वरवर शांत भासणाऱ्या रिशूचा वेडेपणा आणि त्याचे प्रेम पुन्हा परत मिळवण्यासाठी मृत्यूला कवटाळायलाही तयार असणारी रानी यांच्यातला पाठशिवणीचा खेळ काही क्षण का होईना अंगावर काटा उभा करतो. तरीही त्यांची गोष्ट वेडेपणा या सदरातच मोडते.

आधी वास्तव, मध्येच रहस्यकथेचं वळण, पुन्हा प्रेमकथा अशी सणक यावी तशी कथा फिरत राहते. दिग्दर्शक  म्हणून ते वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक विनिल मॅथ्यू यांनी केला असेल असं वाटत नाही. त्या तुलनेत ‘हंसी तो फसी’ हा त्यांचा चित्रपट चांगला होता. या चित्रपटात तापसीपेक्षाही विक्रांत मस्सीचा रिशू जास्त भाव खाऊन जातो. रानी या चित्रपटाची नायिका असली तरी नंतर हा चित्रपट रिशूच्याच खांद्यावर असल्याने विक्रांतला खूप वेगवेगळ्या छटा साकारण्याची संधी या चित्रपटात मिळाली आहे. त्यानेही या संधीचे सोने के ले आहे. तापसीने नेहमीच्या सहज पद्धतीने रानी साकारली आहे. तर हर्षवर्धन राणेचा नील हा तितकाच हवा निर्माण करण्यापुरता असल्याने तो ते काम चोख करतो. अभिनेता आदित्य श्रीवास्तव याने साकारलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिके लाही मर्यादा असल्याने त्यालाही फार वाव मिळालेला नाही. त्या मानाने रिशूच्या आईच्या भूमिके त यामिनी दास लक्ष वेधून घेतात. अमित त्रिवेदीचे वेगळ्या धाटणीचे संगीत चित्रपटाला मानवणारे आहे. आपल्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची गोष्ट यात आहे ती प्रसिद्ध लेखक – गीतकार क्षितिज पटवर्धनने लिहिलेली या चित्रपटातील दोन गाणी. क्षितिजने पहिल्यांदाच हिंदी चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. ‘फिसल जा तू’ आणि ‘मिला यूँ’ ही दोन गाणी क्षितिजने लिहिली आहेत. दोन्ही गाणी सुंदर आहेत, विशेषत: ‘मिला यूँ’ हे गाणं कथेच्या अनुषंगाने चपखल बसलं आहे. नेहमीच्या धाटणीपेक्षा वेगळा चित्रपट म्हणून ‘हसीन दिलरुबा’चा दीदार करायला हरकत नाही, शेवटी उदात्त प्रेमकथाच पदरी पडणार आहे.

हसीन दिलरुबा

दिग्दर्शक – विनिल मॅथ्यू

कलाकार – विक्रांत मस्सी, तापसी पन्नू, हर्षवर्धन राणे, यामिनी दास, आदित्य श्रीवास्तव, दयाशंकर पांडे

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Situation your immense love for the person haseen dilruba movie akp
First published on: 11-07-2021 at 00:01 IST