‘भाई व्यक्ती की वल्ली’ हा पुलंच्या आयुष्यावरचा सिनेमा आला आणि दोन मतप्रवाह तयार झाले. काहींच्या मते हा सिनेमा बोअर आहे, रटाळ आहे. सिनेमात पुलंसहीत ज्या दिग्गजांचं चित्रण करण्यात आलं तसे ते नव्हतेच. काहींचे म्हणणे अगदी उलट आहे. सिनेमा चांगला आहे, सगळ्यांचा अभिनय चांगला आहे. सागर देशमुख या अभिनेत्याने पुलंच्या भूमिकेत चपखल काम केलं आहे. आता या सिनेमाचा दुसरा भागही भेटीला येतो आहे. मात्र यावर होणारी उलटसुलट चर्चा काही थांबलेली नाही. या सिनेमाचे संवाद लेखक आणि समीक्षक गणेश मतकरी यांनीही अखेर या सगळ्या चर्चांबाबत एक फेसबुक पोस्ट लिहून त्यांची भूमिका मांडली आहे.
गणेश मतकरी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात..
मी जनरली स्वत:ला समीक्षक म्हणवणारे ‘भाई व्यक्ती की वल्ली’ बद्दल जे लिहितायत त्याबद्दल काही लिहिण्याचं टाळतोय. एक म्हणजे यातले बहुतेक युक्तीवाद इतके चमत्कारीक आहेत, की त्यावर लिहिणार तरी काय? शिवाय मी स्वत: अनेक वर्ष चित्रपटाविषयी लिहित असल्याने , प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे असंही मी मानतो. दुर्दैवाने हे करताना भाईंवरुन लक्ष हटवून आपण भलतीकडेच नेतोय याचाही त्यांना विसर पडायला लागलेला आहे. आणि आता जरा अतीच होतंय. म्हणजे आमच्यावर अटॅक करता करता भाईंवरही अटॅक व्हायला लागलेत.
गणेश मतकरींनी जसे या सिनेमाबाबत लिहिले आहेत तसेच प्राध्यापक हरी नरके यांनीही. प्रा. हरी नरके यांनी भाई हा पुलंच्या आयुष्यावरचा हलकाफुलका सिनेमा आहे असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पुलंचा देव करण्याची गरज नाही. ते एक रसरशीत प्रतिभावंत व्यक्तीमत्त्व होते. सामान्य प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून हा सिनेमा काढण्यात आला आहे. त्यामुळे निव्वळ कलात्मक दुर्बोध, अंधारातला वगैरे हा सिनेमा नाही. असे हरी नरके यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
काय आहे वाद?
लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांनी लोकरंग पुरवणीत एक लेख लिहिला होता. ‘भाई’: पुलंचं भंपक चित्रण या नावाने हा लेख लिहिण्यात आला होता. ज्यानंतर या सिनेमावर चर्चा रंगली. आता मात्र संवाद लेखक गणेश मतकरी यांनी या सिनेमावर चर्चा होते आहे हे चांगले आहे तरीही आता थेट पुलंवरच अटॅक होतो आहे असे आपल्या पोस्टमधून म्हटले आहे.
हेही वाचा: ‘भाई’: पुलंचं भंपक चित्रण
पुलंवरचा सिनेमा आला की चर्चा होणार हे उघड आहे. कारण पुलंचं लिखाण वाचून घडलेल्या पिढ्या महाराष्ट्रात आहे. फक्त लिखाणच नाही तर त्यांचे कथाकथन ऐकून, त्यांच्या सीडी, कॅसेट्स ऐकून त्या तोंडपाठ असणारी माणसंही महाराष्ट्रात आहेत. आता अशा पुलंवर सिनेमा येणार म्हणजे त्याची चर्चा होणार काहींना तो पटणार काहींना नाही पटणार.. मात्र सध्या होणारी चर्चा चांगली असली तरीही काहीशी वेदनादायी आहे कारण सिनेमावरचा अटॅक आता हळूहळू पुलंकडेच वळू लागला आहे अशी खंत गणेश मतकरी यांनी व्यक्त केली आहे.