‘रिओ २’ या थ्रीडी अ‍ॅनिमेशनपटाच्या हिंदूी आवृत्तीसाठी इम्रान खान आणि सोनाक्षी सिन्हाने आवाज दिला आहे. यापूर्वी बॉलिवूडच्या एकेकटय़ा कलाकारांनी असे आवाज दिले असले तरी एकाच वेळी दोन-दोन कलाकारांनी आवाज देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सध्या प्रसिध्द बॉलिवूड कलाकारांना हॉलिवूडपटांत आवाज देण्यासाठी पाचारण करण्याचे प्रमाण वाढले आहे. शाहरूख खानने २००४ साली ‘द इनक्रेडिबल्स’ या अ‍ॅनिमेशनपटाच्या मुख्य व्यक्तिरेखेसाठी आपला आवाज दिला होता. त्याचा मुलगा आर्यननेही त्यावेळी या चित्रपटासाठी काही हिंदी संवाद म्हटले होते. तर त्यानंतर अक्षय कुमारने त्याचा मुलगा आरवच्या आवडत्या हॉलिवूडपटासाठी आपला आवाज दिला होता. ‘ट्रान्सफॉर्मर्स : द डार्क  ऑफ द मून’ या चित्रपटातील ऑप्टिमस प्राइम या प्रमुख पात्रासाठी अक्षयने आवाज दिला होता.
ट्रान्सफॉर्मर्स चित्रपट मालिका आरवची आवडती असल्याने आणि ऑप्टिमस प्राइम त्याचा हिरो असल्याने आपण या चित्रपटाला आवाज देण्याची तयारी दर्शवली, असे अक्षयने म्हटले होते. अर्थात, अक्षयच्या आवाजाने ‘ट्रान्सफ ॉर्मर्स’ भारतीय प्रेक्षकांना अधिक जवळचा वाटला हेही तितकेच खरे आहे.
डिस्नेच्या ‘प्लेन’ या अ‍ॅनिमेशनपटासाठी प्रियांका चोप्राने आवाज दिला होता. तर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘द लीजंड ऑफ हक्र्युलस’ या चित्रपटातील हक्र्युलसची व्यक्तिरेखा सोनू सूदने आपल्या आवाजाने हिंदीत जिवंत केली. सोनूने या चित्रपटासाठी आवाज दिल्याचे सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. ‘रिओ २’ला सोनाक्षी आणि इम्रानने आवाज दिला आहे. मात्र याच्या प्रिक्वलला म्हणजेच २०११ साली आलेल्या ‘रिओ’साठी रणवीर शौरी आणि विनय पाठक यांनी आवाज दिले होते.
डिस्नेच्या आगामी ‘रेक इट राल्फ’साठी रणबीर कपूरचा आवाज घ्यायचा की अर्जुन कपूर यावर सध्या निर्मात्यांमध्ये विचारमंथन सुरू आहे. अशारितीने, बॉलिवूडचे आवाजी महात्म्य हॉलिवूडमध्ये वाढतच चालल्याचे यावरून स्पष्ट होते.