राजमाता जिजाऊ म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे उत्तम नेतृत्व, कर्तृत्व, मातृत्वाची मूर्ती आणि त्यासोबतच कणखर राज्यकर्ती. पण त्यांच्या याच गुणवैशिष्ट्यांसोबत त्यांच्यातील एक हळवी आईदेखील लपल्याचं स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेतून पाहायला मिळतं. त्यामुळेच सध्या ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. दररोज या मालिकेत नवनवीन घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे आता ही मालिका रंजक वळणावर आल्याचं दिसून येत आहे.
जिजाऊंचे पुण्यातलं आगमन हे स्वराज्य स्थापनेतील महत्त्वाचं पाऊल आहे. शहाजीराजांनी जिजाऊंच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्द केली. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. महत्त्वाच्या घडामोडींचे केंद्र ठरलेल्या पुण्यातील या घटनांचे चित्रण आता ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेतून पहायला मिळणार आहेत. त्यासोबत अनेक नवीन गोष्टींचा उलगडा होणार आहे. त्यामुळे या मालिकेला नवीन रंजक वळण मिळणार आहे.
दरम्यान, पुण्याच्या वेशीवर पहार उखडणे, सोन्याच्या नांगराने नांगरलेली जमीन, पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापना, लालमहालाची बांधणी यातलं नेमकं काय बघायला मिळणार? याबाबतची उत्सुकता आगामी येणाऱ्या काही भागातून उलगडली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.