भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एखादी मालिका बंद करण्याचे आदेश दिल्याचे समोर आलेय. गेल्या अनेक आठवड्यांपासून वादविवाद आणि याचिकांच्या गराडयात सापडलेली ‘पहरेदार पिया की’ ही ‘सोनी एण्टरटेन्मेन्ट’ वाहिनीवरील मालिका बंद करण्याचे आदेश स्मृती इराणी यांच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत. शुक्रवारी या मालिकेचा शेवटचा भाग दाखविण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहिनीने म्हटलेय की, ‘२८ ऑगस्ट २०१७ पासून ‘पहरेदार पिया की’ मालिका टेलिव्हिजनवर बंद करण्यात आली. या मालिकेविषयी घेण्यात आलेला निर्णय त्यासाठी काम करणाऱ्या सर्व टीमसाठी निराशाजनक असून, त्यांची मेहनत वाया गेल्याची आम्हाला जाणीव आहे. यापुढे आम्ही प्रेक्षकांना स्वारस्य असलेल्या मालिका आणण्यावर लक्ष केंद्रित करू. या मालिकेतील कलाकार, निर्माते, प्रेक्षक यांचे आम्ही आभारी असून यापुढेही तुमचा पाठिंबा आमच्या आगामी मालिकांना मिळू देत.’

काही आठवड्यांपूर्वीच प्रेक्षकांनी ही मालिका बंद करण्यासाठी याचिका दाखल केलेली. १० वर्षांचा मुलगा एका १८ वर्षांच्या मुलीसोबत लग्न करतो यावर ‘पहरेदार पिया की’ मालिका आधारित होती. हे लग्न प्रेमामुळे किंवा तडजोड म्हणून होत नाही. तर केवळ त्या मुलीने शेवटचा श्वास घेत असलेल्या मुलाच्या वडिलांना दिलेल्या वचनामुळे ती त्याच्याशी लग्न करते. त्या मुलाची मी सदैव ‘पहरेदारी’ (रक्षण) करेन असे वचन तिने दिलेले असते.

वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर

‘बीसीसीसी’ने दोन आठवड्यांपूर्वीच ‘सोनी’ वाहिनीला या मालिकेची वेळ बदलण्याचे आदेश दिलेले. तसेच, ही मालिका बालविवाहाचा प्रसार करत नाही, अशी पट्टीही चालविण्यास सांगितलेले. त्याप्रमाणे वाहिनीने मालिकेची वेळ १०.३० ची केलेली. पण, माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून अचानक आलेल्या या नोटीसमुळे वाहिनीला खूप मोठा झटका बसला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sony tvs pehredaar piya ki serial ministry of information and broadcasting has been asked to go off air
First published on: 29-08-2017 at 13:06 IST