अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव लवकरच त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार असून निधनानंतरच्या कायदेशीर कारवाया पूर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच तासांत श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र पुढील तपासासाठी पती बोनी कपूर यांना दुबईतच काही काळ थांबावे लागणार असल्याचे वृत्त ‘टाइम्स नाऊ’ने दिले आहे.

कायदेशीर पद्धतींमुळे श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्यास विलंब होत होता. अखेर पुढील काही तासांत त्यांचे पार्थिव भारतात येणार असल्याचे समजते. श्रीदेवी यांचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाल्याचा फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर दुबई पोलिसांनी हे प्रकरण दुबई सार्वजनिक फिर्याद विभागाकडे सोपवले आहे. या विभागाचा अहवालही लवकरच येणार असल्याचे म्हटले जात आहे.

वाचा : श्रीदेवींची हत्या ते दाऊदचे सिनेअभिनेत्रींशी अनैतिक संबंध – सुब्रमण्यम स्वामींना आली भलतीच शंका

श्रीदेवी यांचा सावत्र मुलगा आणि अभिनेता अर्जुन कपूरदेखील सध्या दुबईत आहे. वडिल बोनी कपूर यांची साथ देण्यासाठी मंगळवारी सकाळीच तो दुबईसाठी रवाना झाला. दरम्यान, श्रीदेवी दुबईत ज्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या, तेथील कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवण्यात आला असून तेथील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी पाहिले आहे. त्याशिवाय श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांचीही चौकशी करण्यात आली आहे.