१९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डर’ या थरारपटाने अनेक सिनेरसिकांच्या मनावर छाप पाडली होती. सु्प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ‘डर’च्या माध्यमातून अभिनेता शाहरुख खानची ‘चॉकलेट बॉय’ची प्रतिमा काहीशी दुर सारत खलनायकी शाहरुख प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सिनेसृष्टीत बरीच प्रशंसा मिळवलेल्या या चित्रपटाची जादू आजही कायम आहेत असेच म्हणावे लागेल. आता एका वेब सिरीजच्या रुपात ‘डर’चा थरार पुन्हा अनुभवता येणार आहे.
‘डर: अ वायोलेंट लव्ह स्टोरी’ या चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खानसह सनी देओल, जुही चावला हे कलाकारही महत्त्वाच्या भुमिकेत दिसले होते. पण प्रेक्षकांच्या स्मरणात राहीला तो किंग खानने रंगवलेला खलनायकी प्रेमी. किरन आणि सुनिल (जुही आणि सनी) यांच्या जीवनात संकटांचं वादळ आणणाऱ्या राहुल म्हणजेच शाहरुखने या कथानकाला पडद्यावर अगदी जिवंत केलं होतं.
यू ट्युबवरील ‘वाय फिल्म्स’ या चॅनलवर ‘डर २.०’ ही वेब सिरीज सुरु होणार आहे. ‘डर’ या चित्रपटातील राहुल, किरन, सुनील या पात्राना एका नव्या रुपात सादर करत ही मालिका लवकरच प्रदर्शित होणार आहे. या वेब सिरीजमध्ये ‘डर’च्या थराराची पार्श्वभूमी घेत त्याला काहीसा आधुनिक टच देण्यात आला आहे. सायबर आणि डिजिटल गुन्ह्यांवर या सिरीजचे कथानक आधारलेले आहे. ‘डर २.०’चा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून सोशल मीडियावर त्याची चर्चा आहे.