बदलत्या काळात बदलत्या नातेसंबंधांची कहाणी सांगणारी नवी मालिका ‘नकळत सारे घडले’ आजपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. अभिनेता स्वप्नील जोशीनं या मालिकेद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७:३० वाजता पाहायला मिळणार आहे.
स्टार प्रवाहनं कायमच नाविन्यपूर्ण कथानक असलेल्या मालिका सादर केल्या आहेत. या मालिकांवर महाराष्ट्रानं भरभरून प्रेम केलं. या मालिकांमध्ये ‘नकळत सारे घडले’ या मालिकेच्या रुपानं अजून एकाची भर पडणार आहे. ‘नकळत सारे घडले’ या मालिकेत गोष्ट आहे एका मुलीची. या मुलीवर अगदी तरूण वयातच सावत्र मुलीला सांभाळण्याची जबाबदारी येते. त्याबरोबरच या मालिकेला काही वेगळे पदरही आहेत. कोल्हापूरात राहणाऱ्या आणि वेगळी सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या दोन कुटुंबाची ही गोष्ट आहे.
या मालिकेची स्टारकास्टही उत्तम आहे. अवधूत पुरोहित दिग्दर्शन करत असलेल्या या मालिकेत हरीश दुधाडे, नुपूर परूळेकर, बाल कलाकार सानवी रत्नालीकर, अनुराधा राजाध्यक्ष, उमेश दामले, सुदेश म्हशीलकर, सुरेखा कुडची, प्राची पिसाट यांच्या भूमिका आहेत. अभिजित गुरू याने मालिकेची कथा व पटकथा लिहिली आहे. तर अभिजित पेंढारकर यांनी मालिकेचे संवाद लिहले आहेत. मालिकेचं टायटल साँग नीलेश उजल या नव्या दमाच्या गीतकाराचं असून टायटल साँगचं संगीत नीलेश मोहरीर यांचं आहे.
मालिकेविषयी सांगताना निर्माता स्वप्नील जोशी म्हणाला, ‘या मालिकेत नात्यांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला आहे. या मालिकेत नाट्य आहे, भावभावना आहेत, खूप सारे ट्विस्ट आणि टर्न्स आहेत. म्हणूनच या मालिकेसाठी मी खूप उत्सुक आहे. स्टार प्रवाहच्या ‘देवयानी’, ‘पुढचं पाऊल’ अशा काही मालिका म्हणजे मराठी टेलिव्हिजनवरचे बेंचमार्क आहेत. निर्माता म्हणून मला खात्री आहे, की ‘नकळत सारे घडले’ ही आमची मालिका स्टार प्रवाहच्या आजवरच्या लौकिकाला साजेशी ठरेल.’ मालिका सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियामध्ये या मालिकेचे प्रोमो आणि टायटल साँग लोकप्रिय झालं आहे.