ना ढोल-ताशांचा गजर, ना गुलालाची उधळण, ना फटाक्यांची आतषबाजी, ना भलीमोठी मिरवणूक.. करोनाच्या सावटामुळे शनिवारी अतिशय शांततेत भक्तांच्या घरी दाखल झालेल्या श्रीगणेशाला दीड दिवसाच्या आदरातिथ्यानंतर रविवारी निरोप देण्यात आला. करोनाचे संकट दूर ठेवण्यासाठी अनेक कुटुंबांनी घरातच गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याला प्राधान्य दिले. याला सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नव्हते. मराठीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे याने इमारतीच्या गच्चीवर अत्यंत साधेपणाने बाप्पाला निरोप दिला.
विसर्जनाचा व्हिडीओ सुबोध भावेने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. ‘गणपती विसर्जन.. त्याच उत्साहात, तो जाताना तीच हुरहूर, विसर्जनाची जागा बदलली म्हणून भावना नाही बदलली’, असं म्हणत त्याने चाहत्यांनाही विसर्जनाच्या वेळी गर्दी टाळण्याचं आणि शक्यतो घरीच विसर्जन करण्याचं आवाहन केलं.
दरवर्षी घरगुती गणेश विसर्जनालाही मुंबईतील समुद्रकिनारी हजारोंची गर्दी उसळते. यंदा मात्र, किनाऱ्यापासून काही अंतरावरच बॅरिकेड लावून नागरिकांना येण्यापासून मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना मूर्ती पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द कराव्या लागल्या. महापालिका प्रशासनांनी वेगवेगळ्या भागांत कृत्रिम तलावांची उभारणी करून तेथे विसर्जन करण्याच्या सूचना भाविकांना केल्या होत्या. अनेक ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असल्याने अशा हौदांवरही फारशी गर्दी नव्हती. त्यातही अनेक कुटुंबांनी घरातच गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास प्राधान्य दिले.
