झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेत आता विक्रांत सरंजामेच्या मुलाची एण्ट्री झाली आहे. हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता सुबोध भावेचा मुलगा आहे. सुबोध भावेचा मुलगा मल्हार हा छोट्या जयदीपच्या भूमिकेत दिसणार आहे.
अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या या मालिकेत नेहमीच वेगवेगळे ट्विस्ट येतात. कथानकातील नवनवीन वळणांमुळे मालिकेबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये कामय आहे. नुकतंच या मालिकेत राजनंदिनीची एण्ट्री झाली. अभिनेत्री शिल्पा तुळस्कर ही व्यक्तीरेखा साकारत आहे. मंगळवारच्या भागात राजनंदिनीची दमदार एण्ट्री झाली. तिच्यासोबत छोटा जयदीपही झळकला.
‘तुला पाहते रे’मध्ये सध्या फ्लॅशबॅकच्या माध्यमातून जुना काळ दाखवला जात आहे. त्यामुळे विक्रांत सरंजामे आणि राजनंदिनीची नेमकी कथा काय आहे, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. इशा आणि विक्रांत यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता राजनंदिनीच्या व्यक्तीरेखेला प्रेक्षकांची कशी पसंती मिळते, हे येत्या काही दिवसांत समजेल.
काही दिवसांपूर्वी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत अमोल कोल्हेंची मुलगीही झळकली होती. एकूणच बॉलिवूडमध्ये दिसणारा स्टारकिड्सचा ट्रेंड आता मराठी मालिकेतही दिसू लागला आहे.