मराठीतील चॉकलेटबॉय स्वप्नील जोशी आणि ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा सुबोध भावे शुक्रवारी एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या आगामी ‘फुगे’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी या जोडीने लोकसत्ता ऑनलाइन फेसबुक चॅटच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी दोघांनीही मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ जवळ आल्याचे म्हटले. बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपट सृष्टीबाबतच्या प्रश्नाला उत्तरे देताना सुबोध भावे म्हणाला की, कोणत्याही कलाकाराचे बॉलिवूडमध्ये काम करणे अंतिम ध्येय कधीच नसते. हे क्षेत्र कलाकारासाठी मोठे व्यासपीठ आहे त्याला कोणत्याही सीमा नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात काम करताना प्रत्येक भूमिकेला चांगल्या पद्धतीने न्याय देण्याची ताकद कलाकारामध्ये असायलाच हवी.

या कार्यक्रमामध्ये कलाकारांशी संवाद साधताना एका प्रेक्षकाने  मराठी चित्रपटांच्या कमाईबाबत प्रश्न विचारला होता. मराठी चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये कधी सामील होणार असा प्रश्न त्याने विचारला होता. यावर नागराज मंजुळे याच्या ‘सैराट’ चित्रपटाचे उदाहरण देत चित्रपटसृष्टीमध्ये बदल होताना दिसत असल्याचे सुबोधने सांगितले. गेल्यावर्षी ‘सैराट’ चित्रपटाने चांगली कमाई केली होती. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. यापार्श्वभूमीवर सुबोधने  सैराट टीमचेही अभिनंदन देखील केले. या चित्रपटानंतर मराठीमध्ये बदल पहायला मिळत असल्याचे तो म्हणाला. एका प्रेक्षकाने स्वप्नील जोशीला  मराठी चित्रपटातून हॉलिवूडसाठी काही तयारी करत आहात का? असे विचारले होते. सध्याच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजविणाऱ्या स्वप्नीलने या प्रश्नाला अनोख्या अंदाजात उत्तर दिले. मी या हॉलिवूडमध्ये गेलो तरी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काम करतच राहिन असे त्याने सांगितले. हे सांगत असताना हॉलिवूडच्या  निर्मात्यांनी मराठी कला निर्मितीमध्ये उत्सुकता दाखवली पाहिजे, असे वाटते. अशी परिस्थिती लवकरच  पाहायला मिळेल, असा विश्वास देखील स्वप्नीलने यावेळी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘फुगे’ या चित्रपटाच्या ट्रेलरप्रमाणेच सुबोध आणि स्वप्नील यांच्यातील  केमिस्ट्री या कार्यक्रमात देखील पाहायला मिळाली. दोघांमधील ताळमेळ हा सख्ख्या मित्राचे नाते दाखवून देणारा असाच होता. ‘फुगे’ या चित्रपटामध्ये काम करण्याचा किस्सा शेअर करताना सुबोध म्हणाला की, मला दोन गोष्टीमुळे या चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. त्यातील एक म्हणजे स्वप्नील सोबत काम करायचे होते. तर दुसरे म्हणजे चित्रपटातून प्रेक्षकांना आनंदीत करायचे होते.  स्वप्नीलसोबत काम करण्याची इच्छापूर्ण झाली आहे. आता प्रेक्षकांना आनंद देणे बाकी आहे, ते उद्यापासून सुरु होईलच. जीवाभावाच्या मित्राने चित्रपटाबद्दल भावना व्यक्त केल्यानंतर स्वप्नील जोशीने चित्रपटामध्ये काम करताना आलेले अनुभव शेअर केले. चित्रिकरणावेळी काम  कमी आणि मस्ती ज्यादा केल्याचे तो म्हणाला. त्यामुळे मस्तीखोर लोकांची मांदियाळी असणारा एक सुरेख चित्रपट  ‘फुगे’च्या रुपाने प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मैत्रीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात स्रीप्रधान व्यक्तीरेखेला फारसे महत्व देण्यात आलेले नाही. आम्ही दोघे  एकमेकांत गुंतल्यामुळे हा भास निर्माण होतो. मात्र  स्रीप्रधान व्यक्तीच्या प्रवेशानंतर चित्रपटाला वेगळे वळण मिळताना दिसेल, असे स्वप्नीलने सांगितले. या चित्रपटात प्रार्थना बहेरे अभिनेत्रीच्या रुपात दिसणार आहे. दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांच्या मेहनतीमुळे चित्रपटाला एक बाज मिळाला आहे. त्यामुळे चित्रपट महिला सबलीकरणाचा एक भाग असल्याचे स्वप्नीलने यावेळी स्पष्ट केले.