अभिनेते, निर्माते महेश कोठारे यांनी ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी माफी मागितली आहे. पण महेश कोठारे हे माफी का मागत आहेत असा प्रश्न सर्वांना पडला आहे. महेश कोठारे निर्मित ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील एका भागामध्ये स्त्री पात्राने परिधान केलेल्या कपड्यांवरुन त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यानंतर महेश कोठारे यांनी माफी मागितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१४ सप्टेंबर रोजी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील सँडी या पात्राने परिधान केलेल्या ब्लाऊजवर गौतम बुद्धांचे चित्र दाखवण्यात आले होते. त्या चित्रामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत मालिकेवर टीका केली जात आहे.

आणखी वाचा : अरुंधती घेते सर्वाधिक मानधन; जाणून घ्या ‘आई कुठे काय करते’मधील कलाकारांचे मानधन

ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत महेश कोठारे म्हणाले, ‘मित्रांनो आमची मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं जी स्टार प्रवाहवर प्रसारित होते त्या मालिकेच्या १४ सप्टेंबरच्या भागात आमच्या एका पात्राच्या ब्लाऊजवर वंदनीय गौतम बुद्ध यांचे चित्र होते. या घटनेमुळे बऱ्याच लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या.’

पुढे ते म्हणाले, ‘मला, माझ्या संपूर्ण टीमला गौतम बुद्ध यांच्याविषयी खूप आदर आहे. ही चूक कोणीही मुद्दाम केलेली नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. पण या चुकी बद्दल मी तुमची जाहिर माफी मागतो. अगदी मनापासून माफी मागतो. माझ्या यूनिट तर्फे, टीम तर्फे, आमच्या कलाकारां तर्फे सर्वांतर्फे मी आपली मनापासून माफी मागतो. तुम्ही मला माफ कराल अशी मी आशा व्यक्त करतो.’

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेत गौरी आणि जयदीप यांची अनोखी प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. तसेच अभिनेत्री वर्षा उसगावकर या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. पण १४ सप्टेंबरच्या एका भागामुळे अनेकांनी मालिकेवर टीका केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sukh mhanje nakki kay asta mahesh kothare apologize avb
First published on: 17-09-2021 at 10:40 IST