दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आज प्रचाराच्या तोफा थंडावतील. महाराष्ट्रातही २६ एप्रिल रोजी काही जागांवर निवडणूक होणार आहे. यापैकी अमरावती लोकसभा मतदारसंघासाठीही २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानिमित्ताने महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी अमरावतीत आले. त्यांनी अमरावतीतून महिला मतदारांना केंद्रित केलं. तसंच, नरेंद्र मोदींवर टीका करत त्यांनी देशातील २०-२५ लोकांना अब्जाधीश केलं, आम्ही करोडो लोकांना लखपती बनवणार आहोत, असं राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील अनेक मुद्दे स्पष्ट करून सांगितले.
राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी सरकारने २०-२५ लोकांना अब्जाधीश केलं. नरेंद्र मोदी सरकारने अब्जाधीश तयार केले. आम्ही करोडो लोकांना लखपती बनवायला जात आहोत. तुम्ही म्हणाल की इंडिया आघाडीचं सरकार, काँग्रेसचं सरकार, करोडो लोकांना लखपती कसे बनवणार? हेच मी आज तुम्हाला सांगायला आलो आहे. आमचा जाहीरनामा वाचा.
“सर्वांत पहिलं काम महालक्ष्मी योजना आणणार आहोत. प्रत्येक गरीब कुटुंबाची आम्ही यादी बनवणार. हिंदुस्तानात करोडो लोक दारिद्र्यरेषेच्या खाली राहतात. त्यांची यादी तयार होणार. प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेचं नाव निवडलं जाणार. या महिलेच्या बँक खात्यात काँग्रेस पक्षाचं सरकार, इंडिया आघाडीचं सरकार प्रत्येक वर्षाला थेट बँक खात्यात एक लाख रुपये टाकणार आहे. महिन्याला ८ हजार ५०० रुपये. वर्षांचे १ लाख रुपये करोडो महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये ठकाठक ठकाठक ठकाठक पैसे येणार”, असं राहुल गांधी म्हणाले.
गृहिणींना कोणी पगार दिला नाही
तुम्ही अरबपती बनवा आम्ही लाखपती बनवणार आहोत. भारतात २१ व्या शतकात स्त्री आणि पुरुष दोन्ही जॉब करतात. जॉब करताना ८-१० तासांचा जॉब करतात. महिला आणि पुरुषांना पैसे मिळतात. या देशाची प्रत्येक महिला ८ तास घराच्या बाहेर काम करते आणि मग ८ तास घरात काम करते. स्वयंपाक करते, मुलांचं संगोपन करते, भविष्याची रक्षा करते, पण ८ तासांसाठी तुम्हाला पैसे मिळतात, पण घरात काम करण्यासाठी कोणत्या सरकारने पैसे दिले नाहीत. पुरुषांना हे आवडणार नाही, पण हे भारतातील सत्य आहे. त्यामुळे भारतातील गरिब महिलांच्या खात्यात एक लाख रुपये येणार आहेत, असं राहुल गांधींनी स्पष्ट केलं.
अंगणवाडी सेविकांना दुप्पट मानधन
राज्यात अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स गेल्या अनेक वर्षांपासून मानधनवाढीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनाही राहुल गांधींनी मोठं आश्वासन दिलं आहे. इंडिया आघाडीचं सरकार येताच अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्सना दुप्पट मानधन देण्यात येणार आहे.
महिलांना सार्वजनिक क्षेत्रात ५० टक्के आरक्षण
भारत सरकारच्या सार्वजिनक क्षेत्रात ५० टक्के आरक्षण देणार, असं राहुल गांधी म्हणाले.
बातमी अपडेट होत आहे