‘संतांची, वीरांची भूमी.. असं आपण यापुढे बोलायचं टाळूया. नराधमांची भूमी जास्त योग्य आहे’, अशा शब्दांत अभिनेता सुमीत राघवनने पालघर प्रकरणावर संताप व्यक्त केला. गुरूवारी रात्री पालघरमधील एका गावात लोकांनी तीन साधूंना ठार मारल्याची घटना घडली होती. त्यानंतर दोन दिवसांनी त्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर या प्रकरणी कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुमीतने ट्विट करत लिहिलं, ‘मी सुन्न झालोय. भीषण, भीतीदायक, लाजिरवाणं आहे जे घडलं. संतांची वीरांची भूमी असं टाळूया आपण यापुढे बोलायचं. नराधमांची भूमी जास्त योग्य आहे. ही घटना महाराष्ट्राच्या प्रतिमेवर लागलेला काळा डाग आहे.’ लाज वाटली पाहिजे असं म्हणत त्याने सुमीतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व पालघर पोलिसांना टॅग केलं आहे.

पालघर प्रकरणाचे व्हिडीओ पाहिले नसते तर बरं झालं असतं असं म्हणत त्याने पुढे लिहिलं, ‘जमाव इतका रक्तपिपासू कसा असू शकतो? हा मूर्ख प्रकार कोणीच कसा थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. थोडा वेळ थांबूया आणि खरंच स्वत:ला प्रश्न विचारूया की हे योग्य आहे का? मी सुन्न झालोय. ते व्हिडीओ पाहिले नसते तर बरं झालं असतं. माझ्या डोक्यातून ते चित्र पुसलेच जात नाहीयेत. त्या वृद्ध व्यक्तीला वाचवण्याऐवजी पोलीस तिथून पळ काढत होते. हा प्रश्न मला अनेक वर्ष सतावत राहणार आहे. आपण कुठे चाललोय?’

पालघर प्रकरणाचे व्हिडीओ समोर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उच्च स्तरीय चौकशीची मागणी केली होती. तर दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील या घटनेची गंभीर दखल घेतल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sumeet raghavan expressed anger on palghar three people killed by mob issue ssv
First published on: 20-04-2020 at 10:12 IST