सध्या हृतिकच्या ‘सुपर ३०’ या चित्रपटाची खूप चर्चा आहे. या चित्रपटात हृतिकने आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांची भूमिका साकारली आहे. कोणाताही आधार नसलेली मुलंसुद्धा देशातील बुद्धिमान व्यक्तीमत्त्वांपैकी एक होऊ शकतात हे सिद्ध करण्यासाठी आनंद कुमार संघर्ष करत राहिले. त्याचा हाच जीवनप्रवास ‘सुपर ३०’मधून उलगडण्यात आला आहे.
आज, गुरुपौर्णिमेनिमित्त हृतिकने आनंद कुमार यांची त्यांच्या मूळ गावी जाऊन भेट घेतली. आनंद कुमार आणि हृतिकच्या चाहत्यांनी त्याचे मनापासून स्वागत केले. आनंद कुमार यांनी ट्विटरवरून हृतिकसोबतचे त्यांचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी असे लिहिले आहे की, ‘गौतम बुद्ध, महावीर आणि चाणक्य यांची पवित्र भूमी आज, गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचं स्वागत करते हृतिकजी.’
The pious land of Gautam Buddh, Mahavir and Chanakya welcomes you Hrithikji today on Guru Purnima. #super30 pic.twitter.com/FhvpCl6Fak
— Anand Kumar (@teacheranand) July 16, 2019
या फोटोंमध्ये आनंद कुमार हृतिकला मिठी मारताना दिसत आहेत. या चित्रपटाने अल्पावधीतच बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली आहे. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या दिवशी ११.८३ कोटींची कमाई केली.
या चित्रपटाला समीक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हृतिक (आनंद कुमार) बिहारमधील एका छोट्या गावातील गरीब कुटुंबामधील अतिशय हुशार मुलगा असतो. त्याचे कॅम्ब्रिज विद्यापीठात शिक्षण घेण्याचे स्वप्न असते. परंतु हालाखीच्या परिस्थितीमुळे त्याला प्रवेश घेणे शक्य होत नाही. दरम्यान हृतिकच्या वडिलांचा मृत्यू होतो आणि संपूर्ण घराची जवाबादी हृतिकच्या खांद्यावर पडते. हा संघर्ष अनुभवण्यासारखा आहे.
दरम्यान, ‘सुपर ३०’ या चित्रपटाची निर्मिती रिलायन्स एन्टटेंन्मेंट आणि फँटम फिल्म्सच्या अंतर्गत करण्यात आली आहे. तर चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहल यांनी केलं आहे.