अभिनेता अजय देवगणचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट १० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जादू केली होती. आता चित्रपटाने २०० कोटींचा पल्ला पार करत नवा विक्रम केला आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने तान्हाजी चित्रपटाची कमाई ट्विटरद्वारे सांगितली आहे. प्रदर्शनाच्या १४ दिवसांमध्ये चित्रपटाने १९२ कोटी २८ लाख रुपयांची विक्रमी कमाई केली होती. यातील ७८ कोटी १६ लाख रुपये या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात कमावले. आता १५व्या दिवशी चित्रपटाने २०० कोटींचा गल्ला जमावला आहे. ‘तान्हाजी’ हा यंदाच्या वर्षातील २०० कोटी कमावणारा पहिला चित्रपट आहे.
#Tanhaji benchmarks…
Crossed ₹ 50 cr: Day 3
₹ 100 cr: Day 6
₹ 125 cr: Day 8
₹ 150 cr: Day 10
₹ 175 cr: Day 11
₹ 200 cr: Day 15#India biz.— taran adarsh (@taran_adarsh) January 25, 2020
तसेच चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये नाव नोंदवले आहे. या यादीमध्ये बाहुबली २ : द कॉन्क्लूजन, दंगल, पिके, संजू, बजरंगी भाईजान, कबिर सिंग हे चित्रपट आहेत. आता तान्हाजी चित्रपटाने ७८ कोटी १६ लाख रुपयांची कमाई करत आठव्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.
आणखी वाचा : तान्हाजी टॅक्स फ्री होताच अजयने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले ट्विट, म्हणाला…
‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि हरयाणा येथे कर मुक्त करण्यात आला. महाराष्ट्रात करमुक्त करताच अजयने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. दिग्दर्शक ओम राऊत या मराठमोळ्या दिग्दर्शकाने तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाधा भव्यदिव्य रुपात मोठ्या पडद्यावर मांडली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ओम राऊत यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्यांचा हा पहिलावहिलाच चित्रपट हिट होत असल्याचे दिसत आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबतच सैफ अली खान आणि काजोल मुख्य भूमिकेत दिसत आहे.