Kavi Kumar Azad Passes Away : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील डॉ. हंसराज हाथी ही भूमिका वठविणारे अभिनेता कवी कुमार आझाद यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईतील मीरा रोड येथील वॉकहार्ट रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कवी कुमार आझाद यांच्या निधनाची माहिती आरजे आलोकने त्याच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरुन दिली. मूळ बिहारचे रहिवासी असलेल्या कवी कुमार यांनी ‘तारक मेहता..’ मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. त्यामुळे त्यांच्या अशा अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण टीमला धक्का बसला आहे.

कवी कुमार हे त्यांच्या वाढत्या वजनामुळे त्रस्त होते. त्याचं वजन १२५ किलोपर्यंत वाढल्यामुळे ते यावर उपचार घेत होते. विशेष म्हणजे उपचार सुरु असतानादेखील केवळ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ते या मालिकेमध्ये काम करत होते. या मालिकेव्यतिरिक्त त्यांनी मोठ्या पडद्यावरही काम केलं असून अभिनेता आमिर खानच्या ‘मेला’ आणि ‘फंटूश’ या चित्रपटांमध्ये ते झळकले होते.

दरम्यान, ‘तारक मेहता..’ या मालिकेला नुकतीचं दहा वर्ष पूर्ण होणार असल्यामुळे एका मिटींगचे आयोजनही करण्यात आलं होतं. मात्र त्यापूर्वीच कवी कुमार आझाद यांनी जगाचा निरोप घेतला. कायम प्रेक्षकांना हसत ठेवणाऱ्या कवी कुमार यांच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळे त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसल्याचं दिसून येत आहे.