नवरात्रीच्या निमित्तानं, अभिनेत्री तेजस्विनी पंडित आपल्या अनोख्या कलाकृतींच्या माध्यमातून समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर व्यक्त होत आहे. नऊ दिवस तेजस्विनी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या वेगवेगळ्या कलाकृती पोस्ट करत आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तिने ‘कामाख्या’च्या रुपातील फोटो पोस्ट करत महत्त्वपूर्ण प्रश्न मांडला आहे.

या रुपाचं महत्त्व सांगत तिने लिहिलं, ”वेद , पुराण आणि संस्कृतीचा आपला देश… प्रत्येक नव्या जीवाची निर्मिती होते योनी मधून आणि म्हणूनच माझ्या या रूपात माझ्या योनीची पूजा होते. वेद सांगतात स्त्री प्रमाणे नदीही रजस्व संस्कारा नंतर जीवनाची (पाण्याची) नवनिर्मिती करते तेव्हा त्या काळात तिला स्पर्श करणं टाळावे. जिथे नदीला देखील अश्याप्रमाणे सन्मान देण्याची रीत आहे तिथेच प्रत्येक वर्षी ३०,००० हून अधिक शिलांचं हनन होतंय, ज्या योनीची पूजा व्हावी तिच्यावर निर्घृण वार केले जातात हे कसं सहन करू मी ? दुधाचे दात देखील न आलेल्या माझ्या लेकी वासनेला बळी पडतात तेव्हा त्यासाठी कुणाला जबाबदार ठरवू मी?”

तेजस्विनी गेली दोन वर्षं नवरात्रोस्तवात वेगवेगळ्या संकल्पनांच्या माध्यमातून नारीशक्तीचा आविष्कार घडवत असते. यंदाही जगभरातल्या काही प्रश्नांवर ती भाष्य करणार आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या देवींच्या रुपातून ती या समस्यांवर व्यक्त होत आहे. मुंबईला भेडसावणारी वाहतूककोडींची समस्या मांडताना ती मुंबादेवीच्या रुपाचा आधार घेईल. तसंच या वर्षांत वाघांची मोठ्या प्रमाणात शिकार झाली. हे मांडताना ती माँ शेरावालीचं रुप दाखवेल. तर दहाव्या दिवशी आपल्यातल्या रावणाचं, म्हणजेच चुकीच्या सवयींचं दहन करायचं असा संदेश ती कलाकृतींमधून देणार आहे.