देशभरात सध्या नवरात्रीचा उत्साह आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही नवरात्रोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांनी विशेष तयारी केली असून जागोजागी गरबा आणि दांडियाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सिनेसृष्टीतील कलाकारही मागे नाहीत त्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा देत या आनंदी वातावरणाला आणखी उत्साही केले आहे.
दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत हिने फेसबुकच्या माध्यमातून सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्या दिल्या आहेत. तिने “कोल्हापूरची आंबाबाई ” या रुपातला एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर
“याच उघड्या डोळ्यांनी विनाशाचं तांडव पाहत होते मी…माझ्यासमोर जोडले जाणारे अनेक हात वाहत जाताना पाहत होते मी…
पण मी अवतरणार तरी कशी ? सावरणारे माझे हात टप्या टप्प्याने छाटलेस तू… कधी मोठया रस्त्यांसाठी, कधी साखर कारखान्यांसाठी, तर कधी उंच इमारतींसाठी. ज्या किरणांनी माझं तेज प्रदीप्तीत व्हायचं त्याच्या मार्गातच तुझ्या स्वार्थाचे होर्डिंग्ज लावलेस. मत्स्येंद्री ने फ़ुलणारा माझा रंकाळा जलपर्णीनी जखडून टाकलास तू…म्हणून सावरू शकले नाही तुला…
पण शेवटी मी आई आहे. कठोर झाले तरी साथ नाही सोडणार…
मी बहारायचं नाही सोडणार
मी बहारायचं नाही सोडणार”
असे कॅप्शन देऊन तिने सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या वर्षीही तिने देवीच्या नऊ रुपातील नऊ फोटो फेसबुकवर अपलोड करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. तिच्या शुभेच्छा देण्याच्या या आगळ्या वेगळ्या पद्धतीचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.