मालिका जगतात गेल्या काही दिवसांपासून एकाच विषयाची चर्चा सुरु आहे. ती चर्चा म्हणजे सोनी वाहिनीवर प्रसारित केल्या जाणाऱ्या ‘पहरेदार पिया की’ या मालिकेची. अनेकांनाच खटकणारं कथानक असणाऱ्या या मालिकेत ९ वर्षांचा मुलगा आणि १८ वर्षांची मुलगी यांचं लग्न होताना दाखवण्यात आलं असून, येत्या काही भागांमध्ये सुहाग रात आणि हनिमून यांसारख्या गोष्टीही दाखवण्यात येणार आहेत. आधीच रटाळ मालिकांचा मारा कमी होता की काय, जे आता ‘पहरेदार पिया की’ या मालिकेतून असं काहीतरी सादर करण्यात येत आहे, असाच सूर अनेकांनी आळवला. इतकच नव्हे तर, या मालिकेविरोधात change.org या वेबसाइटवर एक ऑनलाइन याचिकाही दाखल करण्यात आली होती.

‘इंडिया टुडे’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे ही याचिका पोहोचली असून, त्यांनी ‘ब्रॉडकास्टींग कन्टेन्ट कम्प्लेन्ट्स काउन्सिल’कडे (BCCC) तातडीने मालिकेबद्दल योग्य ते निर्णय घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता खुद्द इराणींनीच केलेल्या या मागणीमुळे आता मालिकेचं भविष्य धोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

वाचा : ‘चक दे! इंडिया’विषयी या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

change.org या वेबसाइटवर काही दिवसांपूर्वी ‘पहरेदार पिया की’ या मालिकेविरोधात ऑनलाइन याचिका दाखल करण्यात आली होती. नऊ वर्षीय रतन (अफान खान) आणि १८ वर्षीय दिया (तेजस्वी प्रकाश) यांचे मालिकेत लग्न झालेलं दाखवलंय. त्यामुळे या चित्रपटाचा समवयीन मुलांवर चुकीचा परिणाम होऊ नये यासाठी ही ऑनलाइन याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेला आतापर्यंत एक लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाठिंबा दिला असून, पाठिंबा देणाऱ्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. तेव्हा आता मालिकेचं भविष्य काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.