‘पहरेदार पिया की’ या मालिकेची ज्या उत्साहात सुरुवात झाली होती तो उत्साह आणि मालिकेची पकड मात्र प्रेक्षकांवर पाहायला मिळाली नाही. जुलै महिन्यात सुरु झालेल्या या मालिकेचा सर्वच स्तरांतून मोठ्या प्रमाणात विरोध केला गेल्यामुळे अखेर ही मालिका बंद झाली. या अनपेक्षित वळणामुळे मालिकेतील कलाकारांनाही धक्का बसला होता. पण, त्या धक्क्यातून सावरत कलाकार पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागले होते. ‘पहरेदार…’च्या वाट्याला आलेले अपयश पचवत मालिकेच्या निर्मात्यांनी ‘रिश्ता लिखेंगे हम नया’ ही नवी मालिका सुरु करण्याचा निर्णय घेतला असून, ती प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.

‘रिश्ता लिखेंगे हम नया’ या मालिकेमुळे पुन्हा एकदा ‘पहरेदार…’ विषयीच्या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळतेय. त्याशिवाय आता ही नवी मालिका नेमकी कोणते कथानक पुढे नेणार याविषयी अनेकांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. ‘रिश्ता लिखेंगे…’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच आता निर्माते सुमित मित्तल यांचे वक्तव्यही प्रकाशझोतात आले आहे. “त्या (पहरेदार…) मालिकेच्या कथानकात कोणतीही चुकीची गोष्ट होती असे आम्हाला वाटत नाही. काही गोष्टींच्या बाबतीत लावलेले अंदाज चुकूही शकतात. निर्मात्यांच्या दृष्टीने सांगायचे झाले तर एखादी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे की नाही याकडे आम्ही लक्ष देणे अपेक्षित होते. प्रेक्षकांच्या पसंतीसोबतच त्या मालिकेच्या माध्यमातून चांगला संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यालाही प्राधान्य दिले जाते. आम्हा सर्वांच्या मते ‘पहरेदार पिया की’ अगदी योग्य मार्गावर जाणारी मालिका होती”, असे ते म्हणाले होते.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

‘पहरेदार पिया की’ ही मालिका सोशल मीडियावरील चुकीच्या चर्चांमुळे बंद झाली होती. पण, ‘रिश्ता लिखेंगे हम नया’ या मालिकेचे कथानक पूर्णपणे वेगळे असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तेव्हा आता प्रेक्षकांसोबत नात्याचे नवे बंध बांधण्यात ही मालिका यशस्वी ठरते का, हे जाणून घेण्यासाठी खुद्द कलाकारही उत्सुक आहेत असे म्हणायला हरकत नाही.