गौरव खन्ना सध्या बिग बॉसमध्ये आहे. ‘अनुपमा’ फेम गौरव खन्ना, मास्टरशेफ या रिअॅलिटी शोचा विजेता ठरला होता. त्यानंतर आता तो बिग बॉसमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. गौरव खन्ना या शोमध्ये आल्यापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा होतेय. गौरव खन्नाने अभिनेत्री आकांक्षा चमोलाशी लग्न केलंय.
गौरव खन्ना बिग बॉसमध्ये आल्यानंतर आकांक्षा त्याला सपोर्ट करत नाही, अशा चर्चा झाल्या. याच दरम्यान आकांक्षाने करवा चौथला पोस्ट केली होती. तिने गौरवबरोबरचे फोटो पोस्ट करत त्याची आठवण येत असल्याचं म्हटलं होतं.
गौरव खन्ना व आकांक्षा चमोला यांची लव्ह स्टोरी खूप फिल्मी आहे. दोघांची पहिली भेट एका ऑडिशनवेळी झाली होती. गौरवला पहिल्या नजरेत आकांक्षा आवडली. आकांक्षाला गौरवबद्दल माहीत नव्हतं. त्यामुळे गौरवने तो इंडस्ट्रीत नवखा असल्याचं भासवलं. गौरवला आकांक्षा अॅक्टिंग टिप्स देत होती, तेव्हा तिला जाणवलं की गौरव नवखा नाही. हळूहळू दोघांचं बोलणं वाढलं, जवळीक वाढली, दोघे प्रेमात पडले. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर गौरव व आकांक्षा यांनी २४ नोव्हेंबर २०१६ रोजी कानपूरमध्ये लग्न केलं. त्यांच्या लग्नाला पूजा बॅनर्जी, अनुज सचदेवासह अनेक टीव्ही स्टार गेले होते.
गौरव व आंकाक्षा यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. दोघेही आनंदी वैवाहिक जीवन जगत आहेत. त्यांच्यात वयात बरेच अंतर आहे, गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा त्याच्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे. अभिनेता ४३ वर्षांचा आहे, तर त्याची पत्नी ३४ वर्षांची आहे. गौरव खन्ना नेहमीच या महत्त्वपूर्ण वयाच्या फरकाबद्दल मोकळेपणाने बोलत आला आहे. वय त्यांच्या नात्यात कधीही अडथळा ठरलं नाही, असं गौरव म्हणतो.
बाळ नसण्याबद्दल गौरव झालेला व्यक्त
बिग बॉसमध्ये सुरुवातीला मृदुलने गौरवला त्याचं लग्न व मुलांबद्दल विचारलं. ‘तुमच्या लग्नाला किती वर्षे झाली आहेत?’ असं मृदुलने गौरवला विचारलं. त्यावर ‘९ वर्षे,’ असं गौरव म्हणाला. ‘तुम्हाला मुलं आहेत का?’ असं मृदुलने गौरवला विचारलं. गौरव म्हणाला, “नाही! माझ्या पत्नीला (आकांक्षा चमोला) मुलं नको आहेत.” हे ऐकून मृदुल स्तब्ध झाला. त्याने गौरवला विचारलं, ‘आणि तुम्हाला?’ यावर गौरव मृदुलला समजावत म्हणतो, “मला पाहिजे. पण आमचं लव्ह मॅरेज आहे, त्यामुळे ती जे म्हणेल ते ऐकावं लागेल. प्रेम केलंय तर साथ द्यावी लागेल ना.”
गौरव म्हणाला, “मूल सांभाळणं ही मोठी जबाबदारी असते. आता ती व मी सोबत राहतो. मी कामावर जातो, तिलाही काम मिळालं की मग आम्हाला बाळ दुसऱ्या कुणाजवळ ठेवायचं नाही. मला बाळ हवे होते, पण जेव्हा तिने मला या गोष्टी समजावून सांगितल्या तेव्हा मी म्हणालो, ठीक आहे.”
आकांक्षा चमोला लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने ‘स्वरागिनी’ मालिकेतून करिअरची सुरुवात केली होती. नंतर तिने इतर काही मालिका केल्या.
