नुकतंच नव्या संसद भवनाच्या इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. तर त्याच दिवशी भारतीय कुस्तीपटूंनी जंतरमंतर मैदानावर आंदोलन केलं. कुस्तीपटूंचं हे आंदोलन सध्या चांगलंच चर्चेत आहे. या वेळी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. याबाबत आता सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. अभिनेता सुयश टिळक यानेदेखील एक फोटो पोस्ट करीत घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. पण, अटकेच्या मागणीसाठी २३ एप्रिलपासून कुस्तीपटू जंतरमंतर मैदानावर आंदोलन करीत आहेत. नव्या संसदेचं उद्घाटन होत असताना आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं सांगत ‘महिला महापंचायत’ भरविण्यासाठी संसद भवनाकडे निघालेल्या कुस्तीगिरांची पोलिसांनी धरपकड केली. त्यांना ताब्यात घेण्यात आलं. ऑलिम्पिक विजेते कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, संगीता फोगट, विनेश फोगट यांचा या आंदोलनात सहभाग होता. आता सर्वत्र या घडल्या प्रकारचा निषेध व्यक्त केला जात आहे. आणखी वाचा : कुस्तीपटूंवरील कारवाईनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची पोस्ट, म्हणाली… देशभरातील अनेक कलाकार कुस्तीपटूंच्या बाजूने उभे राहिले आहेत. यामध्ये अनेक मराठी कलाकारांचाही समावेश आहे. कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीनंतर अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावरून राग व्यक्त केला. अभिनेता सुरेश टिळक यानेदेखील काल त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या कुस्तीपटूंचे फोटो शेअर केले. यात एका फोटोमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवलेले दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये टे पोलिसांशी झटापट करताना दिसत आहेत. हा फोटो पोस्ट करत सुयशने लिहिलं, "आपले खेळाडू हिरो नक्कीच यापेक्षा चांगलं डिझर्व करतात." हेही वाचा : Video: सुयश टिळकच्या पत्नीने भर रस्त्यात केला डान्स, अभिनेत्याची कमेंट चर्चेत आता सुयशने पोस्ट केलेली ही स्टोरी चांगलीच चर्चेत आली आहे. सुयशबरोबरच अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कुस्तीपटूंची बाजू घेत भाष्य केलं आहे. तर अनेक राजकारणी, नेते यांच्याबरोबरच सामान्य जनताही घडल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करताना दिसत आहे.