गोविंदाची भाची व प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आरती सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिने स्वतःच लग्नाच्या तारखेची माहिती दिली आहे. आरती २५ एप्रिलला लग्न करणार आहे. तिच्या होणाऱ्या पतीचं नाव दिपक चौहान आहे. आरती व दिपकचं अरेंज मॅरेज आहे. दिपक हा नवी मुंबईचा असून व्यावसायिक आहे. मेहंदी, हळद व २५ एप्रिलला लग्न असेल, असं आरतीने ‘इ-टाइम्स’ ला सांगितलं. तिने दिपकशी भेट कशी व केव्हा झाली, याबाबत माहिती दिली.

आरती म्हणाली, “मागच्या वर्षी २३ जुलैला आम्ही पहिल्यांदा बोललो आणि ५ ऑगस्टला पहिल्यांदा भेटलो. नंतर भेटीगाठी वाढल्या आणि नोव्हेंबरमध्ये आम्ही लग्नाचं ठरवलं. पण दोन्ही कुटुंबानी होकार देईपर्यंत आम्ही पुढे गेलो नाही. १ जानेवारीला दिपकने मला दिल्लीतील माझ्या गुरुजींच्या मंदिरात लग्नासाठी मागणी घातली आणि मी हो म्हणाले. तिथेच साखरपुडा झाला, असं मी मानते.”

पती फोटोग्राफर तर सासरे मंत्री, स्वत: राजकुमारी असलेली अभिनेत्री अभिनय सोडून रमली संसारात, पाहा Photos

दिपकचा स्वभाव शांत असल्याचं आरतीने सांगितलं. “अरेंज मॅरेज सेटअपमध्ये एखाद्याला भेटताना शंका असतात, काही अडचणी येतात. पण दिपकला भेटल्यावर मात्र काहीच वाटलं नाही. आमच्यात मैत्री झाली आहे. तो माझ्या आयुष्यात शांतता आणतो. मी नशीबवान आहे की तो माझ्या आयुष्यात आला. मी जशी आहे तशीच त्याच्यासह, त्याच्या दोन बहिणी व त्याच्या वडिलांसमोर वागू शकते, मी आधीच लग्न केलं नाही ते बरं झालं. योग्य वेळेत सगळ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि आता माझी नात्यांची समज वाढली आहे,” असं आरती म्हणाली.

Video: खूपच सुंदर गातात डॉ. नेने, माधुरी दीक्षितसह गायलं रोमँटिक गाणं; व्हिडीओ पाहिलात का?

हनिमूनबद्दल विचारल्यावर आरती म्हणाली, “आम्ही त्याबद्दल चर्चा करतोय, पण अजून काही ठरलं नाही. लग्नानंतर मंदिरात जाण्यास माझं प्राधान्य आहे. मी आमचं नवीन घर सजवण्यास खूप उत्सुक आहे, कारण ते माझ्यासाठी हनिमूनपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे.” मामा गोविंदाला लग्नाबाबत सांगितलंय का, असं विचारल्यावर आरती म्हणाली, “मी चिचीमामाला माझ्या लग्नाबद्दल सांगितलं आहे. मामा माझ्याासठी खूप आनंदी आहेत. त्यांनी माझ्या लग्नात मला आशीर्वाद देण्यासाठी यावं, अशी माझी इच्छा आहे. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, त्यामुळे ते माझ्या लग्नाला येतील अशी मला खात्री आहे.”