‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन सध्या ‘लाफ्टर शेफ्स २’ मध्ये झळकत आहेत. शोमध्ये विकी व अंकिता एकमेकांवर अनेकदा चिडत असतात. दोघांच्या कुरबुरी होत असतात. लहान लहान कारणांवरून वाद होतात. एका ताज्या एपिसोडच्या शूटिंगदरम्यान पुन्हा विकी व अंकिताचं सेटवर भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे.
एक पदार्थ बनवताना अंकिता व विकीचं भांडण झालं. झालं असं की अंकिता तो पदार्थ योग्य पद्धतीने बनवत नाहीये, असं विकीला वाटलं. त्यामुळे तो अंकिताला वैतागला आणि तिच्यावर भडकला. इ-टाइम्सने यासंदर्भात वृत्त दिलंय.
विकी व अंकिताचं भांडण
चिडलेला विकी अंकिताला म्हणाला, “वेडी झाली आहेस तू.” पतीचं हे म्हणणं अंकिताला अजिबात आवडलं नाही आणि ती त्याच्यावर संतापली आणि त्याला “वेडा कुठला,” असं म्हणाली. यानंतर विकीने अंकिताला विचारलं की ती त्याला वेडा का म्हणत आहे. त्यावर अंकिता म्हणाली, “तू आधी मला वेडी म्हणालास. मी बोलले नाही.” अंकिता व विकीचं भांडण इथेच थांबलं नाही.
विकी अंकिताला म्हणाला, “इतकं हायपर व्हायची खरंच गरज आहे का?” त्यावर अंकिता म्हणाली, “मी नाही तूच हायपर होत आहेस.” मग विकी अंकिताला म्हणतो की तू चुकीचं वागतेय. विकी व अंकिताची अशी भांडणं या शोमध्ये होतंच असतात. याआधीच्या एपिसोडमध्ये दोघांनी ते लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत, असं म्हटलं होतं. हे ऐकून सेटवरील सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पण नंतर मात्र याबद्दल बऱ्याच दिवसांपासून बातम्या येत असल्याचं म्हणत गरोदर नसल्याचं अंकिताने स्पष्ट केलं होतं.
अंकिता लोखंडे आधी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर अंकिताच्या आयुष्यात विक्की जैन आला. दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केलं आणि डिसेंबर २०२१ मध्ये त्यांनी लग्न केलं. अंकिता व विकी यांनी ‘बिग बॉस’मध्ये एकत्र सहभाग घेतला होता. व्यावसायिक असलेल्या विकीला बिग बॉसमुळे खूप लोकप्रियता मिळाली होती. नंतर दोघेही ‘लाफ्टर शेफ्स’मध्ये एकत्र झळकले. या शोमध्येही दोघांची बरेचदा भांडणं होत असतात.