Atharva Sudame Controversy : सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या काही कंटेंट क्रिएटर्सपैकी एक म्हणजे अर्थव सुदामे. पुणेरी शैलीत मजेशीर व्हिडीओ शेअर करत अनेकांना हसवणारा अर्थव दोन दिवसापासून एका वादाने चर्चेत आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अथर्वने ‘मूर्ती एक, भाव अनंत’ अशा शीर्षकाचं एक रिल शेअर केलं होतं. एका मुस्लीम मूर्तिकाराकडून गणपतीची मूर्ती विकत घेण्याचा प्रसंग या रिलमध्ये चित्रित करण्यात आला होता.
धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभावाला प्रोत्साहन देणारं होतं. त्याने शेअर केलेल्या या रिलवर ब्राह्मण महासंघासहित काही लोकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर अथर्वने व्हिडीओद्वारे माफी मागत ते रिल डिलीट केल्याचं सांगितलं. यानंतर आता अनेक स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अशातच ‘बिग बॉस मराठी ५’ फेम घन:श्याम दरवडे अर्थात छोटा पुढारीने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
घन:श्यामने युट्युबवर व्हिडीओ शेअर करत असं म्हटलंय, “अथर्व सुदामे हे नाव तुम्हाला माहीतच असेल. कधीही पुणेरी भाषेत टोमणे देणारे रील, तर कधी सामाजिक संदेश देऊन लोकांना जागरूक करण्याचं काम ते करतात. मनसे नेते राज ठाकरेंबरोबरही त्यांची चांगलीच मैत्री आहे. त्यांनी गणपती सणावर एक व्हिडीओ केला, ज्यामुळे त्यांना अनेकांकडून ट्रोलिंग सहन करावं लागत आहे. त्या दादाला माफी मागावी लागली. मी एक सांगू इच्छितो, ज्यांना ट्रोलिंग करायची आहे, त्यांनी हा माणूस किती संघर्ष करून पुढे आला आहे याचा विचार केला पाहिजे.”
यापुढे तो म्हणतो, “मी स्वतः तो व्हिडीओ पाहिला. मला त्यात काही चुकीचं वाटलं नाही. त्या दादाने माफी मागितली आणि तो व्हिडीओसुद्धा डिलीट केला आहे. त्याने माफी मागतानासुद्धा म्हटलं की, मी प्रत्येक सणावर व्हिडीओ बनवतो. आणि खरंच त्याचे व्हिडीओ खूप छान असतात. हसायला येतं. तसंच अनेकदा हसण्याचा माध्यमातून सामाजिक विषय कळतात, की हे असं व्हायला नको. मला एकच सांगायचं आहे, आपला मुलगा आहे, त्याला आपण सगळ्यांनी मोठ्या मनाने माफ केलं पाहिजे.”
यानंतर छोटा पुढारीने म्हटलं, “आपला माणूस मोठा होतोय तर त्याला साथ दिली पाहिजे. त्याला मागे खेचू नका. आता त्याने व्हिडीओ केला, पण डिलीटसुद्धा केला. त्यामुळे त्याला माफ करा. अर्थव सुदामे दादाला मी एक सांगेन, तुम्ही जे व्हिडीओ करता ते विचारपूर्वक करा. अशा गोष्टी करत नका जाऊ. आता मला तो व्हिडीओ योग्य वाटला, पण प्रत्येकाला वाटेलच असं नाही. मूर्ती बनवताना ती मनोभावे बनवावी हा तुमचा उद्देश छान होता; पण काही लोकांना तो व्हिडीओ खटकला. स्वाभाविक आहे. इतिहास माहिती नसेल तर अशा गोष्टींचं चित्रीकरण करू नये. पण हे होऊनही तू मोठ्या मनाने माफी मागितली, हेच खूप आहे.”
शेवटी घन:श्याम म्हणतो, “सगळ्यात महत्त्वाचं आपली माणसं आहेत, त्यांना साथ द्या. त्याने इतकं काय वेगळं केलेलं नाही. इतर काही लोक कसेही व्हिडीओ बनवतात, पण त्याने एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला माफ करा. अथर्व दादा इथून पुढे अशा चुका करू नको. हेच मला तुला सांगायचं आहे. पुढे सावध राहा. आता गणपती बाप्पा येत आहेत, त्यांच्या आशीर्वादाने सगळं काही चांगलं होईल.”