बिग बॉस 19 मध्ये तान्या मित्तलच्या श्रीमंतीच्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. तान्या रोज तिच्या नवनवीन व्यवसायांबद्दल सांगत असते, ज्यामुळे घरातील इतर स्पर्धकांबरोबरच प्रेक्षकही आश्चर्य व्यक्त करतात. १५० बॉडीगार्ड्स, ८०० कर्मचारी आणि ग्वाल्हेरमध्ये सेव्हन स्टार हॉटेलसारखं घर असे दावे करणाऱ्या तान्याने आता तिच्या नवीन व्यवसायाबद्दल सांगितलंय.

सहा वर्षांपूर्वी मिस एशिया जिंकणारी तान्या म्हणाली, “मी शाळा आणि कॉलेजमध्ये असताना वर्गातील सर्वात ‘कूल’ विद्यार्थिनी नव्हते, माझे मित्र नव्हते कारण शाळेनंतर मी झोपडपट्टीतील मुलांबरोबर वेळ घालवायचे. त्यांच्याकडून नवीन गोष्टी शिकायचे. मी बरेच स्पीकिंग कोर्सेस केले आहेत. मी ५३ कलांमध्ये पारंगत आहे.”

व्यवसाय सुरू करण्यामागचे कारण तान्याने सांगितले. “जेव्हा मी हँडमेडलव्ह (तिची गिफ्टिंग कंपनी) सुरू केली, तेव्हा मला वाटलं की लोक एकमेकांना हसवू शकत नाही, ही समस्या आहे. मी हा व्यवसाय सुरू करू लोकांना हसवलं. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या तरुणांना मी लक्ष्य केलं. जोडप्यांनी जोडीदारांसाठी माझ्या ब्रँडच्या वस्तू घेतल्या. या तरुण जोडप्यांनी मला फक्त २ वर्षात देशातील कोट्याधीश लोकांपैकी एक बनवलं,” असं तान्या म्हणाली.’

६५ रुपयांना विकते आगपेटी

व्यवसायातील नफ्याचं गणित तान्याने सांगितलं. “हँडमेडलव्हमध्ये, मी आगपेटी विकते. ते माझं स्टार प्रॉडक्ट आहे, कारण त्यातून मला सर्वाधिक नफा मिळतो. एक आगपेटी १ रुपयाची मिळते, पण मी ती ६५ रुपयांना विकते. मी त्या साध्या आगपेटीवर काहीतरी रेखाटते. मला माझ्या कल्पनेचे आणि कौशल्याचे ६४ रुपये मिळतात. त्यातून ९९% नफा मिळते. माझ्या कंपनीत कोणतेही कर्मचारी नव्हते. सगळं मी एकटीने केलं. मी प्रॉडक्ट बनवले, ते पॅक केले आणि कुरियर केले. ६ महिन्यांत देशभरात माझे २०,००० ग्राहक झाले,” असं तान्या म्हणाली.

ग्राहकांच्या तक्रारी अन् कंपनी तोट्यात

सगळं नीट सुरू असताना तान्याकडे ग्राहकांच्या तक्रारी येऊ लागल्या. “एकदा मी पाठवलेले ३० पार्सल खराब झाले होते. सर्व ग्राहकांनी मला फोन केला आणि खराब पॅकेजिंग चांगली नसल्याचं सांगितलं. माझी कंपनी तोट्यात गेली, कारण मला सर्व ग्राहकांना पैसे परत करावे लागले. मी खूप रडले, स्वतःवर शंका येऊ लागली. पण मी दुसऱ्या दिवशी कुरिअर ऑफिसमध्ये गेले, त्यांना विचारलं की मला पॅकेजिंग शिकवा. मी त्यांना दुप्पट पैसे दिले आणि पुन्हा काम सुरू केले,” असं तान्याने नमूद केलं.

तान्याने ती सुंदर नसल्याने बॉयफ्रेंडने ब्रेकअप केलं होतं, असं सांगितलं. “मी एका नात्यात होते, माझ्या बॉयफ्रेंडने मी सुंदर नाही असं म्हणत ब्रेकअप केलं. मी नैराश्यात गेले होते, पण नंतर मी स्वतःला ग्रूम केलं आणि मेकअप कसा करायचा हे शिकले,” असं तान्या म्हणाली.