आरोह वेलणकर ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात झळकला होता. त्याने वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून ‘बिग बॉस’च्या घरात एंट्री घेतली होती, पण तो ग्रँड फिनाले आधीच्या आठवड्यात घरातून बाहेर पडला. तो जवळपास ४५ दिवस ‘बिग बॉस’च्या घरात राहिला. त्यापूर्वी आरोह बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वातही सहभागी झाला होता. दरम्यान, ‘बिग बॉस’च्या ग्रँड फिनालेला १० दिवस उलटले आहेत, अशातच आरोह वेलणकरने केलेली पोस्ट चर्चेत आहे.
“मागचे ४५ दिवस माझ्यासाठी शारीरिकदृष्ट्या व भावनिकदृष्ट्या खूप कठीण होते. यावेळी बिग बॉसच्या घराने माझ्या सर्व मर्यादांची परीक्षा घेतली. त्यातून बरा होतोय आणि सावरतोय. मी दोन वेळा फायनलमध्ये पोहोचलो, त्यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. पण, त्यापेक्षा मी एक चांगला माणूस म्हणून प्रेक्षकांच्या हृदयात आणि मनात माझ्यासाठी स्थान मिळवलं आहे. रिअॅलिटी शोची ही जादू आहे. आता अभिनेता म्हणून २०२३ मध्ये पुढच्या प्रोजेक्टची वाट पाहत आहे,” असं आरोहने इन्स्टाग्रामला एक फोटो शेअर करत कॅप्शन लिहिलं आहे.
आरोह सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, तो त्याचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. दरम्यान, त्याच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास प्रविण तरडे लिखित आणि अभिजीत पानसे दिग्दर्शित ‘रेगे’ या चित्रपटातून आरोहने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील त्याचं अभिनयामुळे त्याला ‘घंटा’ हा चित्रपट मिळाला होता. या दोन्ही चित्रपटातील त्याच्या अभिनयाची चर्चा झाली. त्याने रंगभूमीवर ‘व्हाय सो गंभीर’ या नाटकामध्येही काम केलं होतं.