Chala Hawa Yeu Dya Fame Gaurav More Funny Video : ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ गौरव मोरे त्याच्या विनोदीशैलीमुळे आणि दमदार अभिनयाने कायमच सर्वांच मन जिंकून घेतो. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गौरव गेली अनेक वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. आता गौरव ‘गँगलॉर्ड्स’च्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या नव्या सीझनमध्ये तो पाच गँगलॉर्ड्सपैकी एक असणार आहे.

गौरव मोरेने याच पार्श्वभूमीवर एक अतरंगी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता मोबाइल फोनमध्ये पाहून कोणाशी तरी संवाद साधत असल्याचं पाहायला मिळतंय. आता ‘ती’ कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकामध्ये निर्माण झालेली आहे.

गौरव मोरे मोबाइलमध्ये तिच्या फोटोकडे पाहून म्हणतो, “जानू मला कळत नाहीये तुला कसं सांगू… आता ३० दिवस मी तुझ्या संपर्कात नसेन. ब्लॉक नाही करणार म्युट करेन…आपली ही शेवटची भेट… आपण एकत्र किती छान वेळ घालवला… एकत्र नवीन वर्षाची पार्टी केली, बॅचलर पार्टी केली, रविवारची दुपारची पार्टी, ऑफिसमधला तणाव…हे सगळं मी तुझ्यामुळे हँडल करू शकलो. पण, आता तुला सोडावं लागेल. काळजी घे बाय…”

“आपल्या लाडक्या गौरवला सपोर्ट करा… तुम्हीपण ‘ती’ला महिनाभर ब्लॉक करा” असं कॅप्शन देत ‘झी मराठी’ने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

गौरव मोरेचा व्हिडीओ व्हायरल

गौरवचे डायलॉग ऐकून तो कोणत्यातरी मुलीशी बोलतोय असा गैरसमज आपल्याला होतो पण, प्रत्यक्षात असं काहीच नाहीये. गौरवची डायलॉगबाजी संपल्यावर शेवटी मोबाइल फोनमधील ‘ती’चा फोटो सर्वांसमोर उघड करण्यात येतो आणि एकच हशा पिकतो. कारण, गौरवच्या फोनमध्ये शेवटी कोंबडीचा फोटो पाहायला मिळतो.

आता लवकरच श्रावण सुरू होतोय, वैयक्तिक इच्छेनुसार अनेक लोक यादरम्यान मांसाहार करत नाहीत. श्रावण महिन्यात मांसाहार न करण्यामागे धार्मिक तसेच शास्त्रीय कारणं देखील आहेत. त्यामुळेच अभिनेत्याने हे सगळे डायलॉग कोणत्याही मुलीला उद्देशून नव्हे तर कोंबडीला उद्देशून म्हटलेले आहेत. गौरवचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गौरव मोरे पहिल्यांदाच एन्ट्री घेत असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचं नवीन पर्व २६ जुलैपासून सुरू होत आहे. शनिवार-रविवार हा कार्यक्रम रात्री ९ वाजता प्रसारित केला जाईल.