महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेला इयत्ता दहावीचा निकाल आज १३ मे रोजी जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आज सगळीकडे याच गोष्टीची चर्चा सुरू आहे. पालक त्यांच्या मुलांना मिळालेले गुण आनंदानं सोशल मीडियावर पोस्ट करीत त्यांचं कौतुक करताना दिसत आहेत. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्यानेसुद्धा त्यांच्या मुलाची गुणपत्रीका सोशल मीडियावर पोस्ट करीत ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे.
‘उदे गं अंबे’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते गिरीश परदेशी अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही सक्रिय असून त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडी प्रेक्षकांसह सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करीत असतात. अशातच आता त्यांनी नुकतीच एक आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर करीत सांगितली आहे. त्यांनी त्यांचा मुलगा क्रिशिव परदेशी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला असून त्याला ९७.४० टक्के इतके गुण मिळाले आहेत, अशी पोस्ट केली आहे. क्रिशिव परदेशी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला असून त्याच्या शाळेत त्याने चौथा क्रमांक पटकावला असल्याचं सांगितलं आहे.
गिरीश यांनी मुलाची गुणपत्रीका शेअर करीत, “अभिनंदन, तुझा आम्हाला खूप अभिमान आहे,” असं म्हटलं आहे. त्यामुळे गिरीश यांच्या मुलाने कौतुकास्पद कामगिरी केल्याचं पाहायला मिळतं.गिरीश यांच्याबद्दल बोलायचं झालं तर नुकतेच ते स्टार प्रवाहवरील ‘उदे गं अंबे’ या मालिकेत रेणू राजाच्या भूमिकेत झळकले होते.
‘उदे गं अंबे’ या मालिकेत अभिनेते देवदत्त नागे, मयुरी कापडणे, गिरीश परदेशी, किरण ढाणे, नकुल घाणेकर यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते; तर काही दिवसांपूर्वीच या मालिकेने काही काळासाठी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. येणाऱ्या काळात या मालिकेचा पुढचा अध्याय सुरू होणार असल्याचं वाहिनीकडून सांगण्यात आलं आहे.