‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मागील १७ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अजूनही या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. टीआरपी यादीतही हा शो टॉपमध्ये असतो. या शोची निर्मिती असित मोदी यांनी केली आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी हा शो सोडला. त्यामुळे शोमधील कलाकार व निर्मात्यांच्या भांडणाच्या बातम्या येत असतात.
या मालिकेत मिसेस रोशन नावाची भूमिका आधी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने साकारली होती. तिने हा शो सोडला आहे, पण आता एका मुलाखतीत तिने शोच्या निर्मात्यावर आरोप केले आहेत. एकदा मालिकेत जेठालाल गडा ही मुख्य भूमिका करणारे दिलीप जोशी व निर्माते असित मोदी यांचं भांडण झालं होतं, असा दावा जेनिफर मिस्त्रीने केला आहे.
दिलीप जोशी व असित मोदींचं झालेलं भांडण – जेनिफर
फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत जेनिफर मिस्त्रीने याबद्दल सांगितलं. “हाँग काँगमध्ये दोघांचं खूप वाईट भांडण झालं होतं. लोकांसमोर कडाक्याचं भांडण झालं होतं आणि ते एकमेकांवर खूप ओरडले होते. दिलीप जींनी असित मोदींची कॉलर धरली होती. वातावरण प्रचंड तापलं होतं. एकदा तर अती झालं होतं. सगळे वैतागले होते. दिलीप जी व असित मोदींदरम्यान वाद झाला होता,” असं जेनिफर मिस्त्री म्हणाली होती.
भांडणाच्या अफवा
दरम्यान, या पूर्वीही दिलीप जोशी व असित मोदी यांच्यात भांडण झाल्याच्या बातम्या बरेचदा आल्या. काही महिन्यांपूर्वी तर दिलीप जोशी यांना यासंदर्भात स्पष्टीकरणही द्यावं लागलं होतं. दिलीप जोशी आपल्या सुट्ट्यांबद्दल बोलण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा असित मोदी यांनी संभाषण टाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे दिलीप चिडले, अशी चर्चा सुरू होती. ते शो सोडणार, असं म्हटलं जात होतं.
दिलीप जोशींनी दिलेलं स्पष्टीकरण
“मला फक्त या सर्व अफवा दूर करायच्या आहेत. माझ्या आणि असित भाईबद्दल माध्यमांमध्ये काही बातम्या आल्या आहेत, ज्या पूर्णपणे खोट्या आहेत. अशा गोष्टी बोलल्या जातात हे पाहून मला खूप वाईट वाटतं. तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो माझ्यासाठी आणि लाखो चाहत्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा लोक अशा अफवा पसरवतात तेव्हा फक्त आम्हालाच नाही तर आमच्या प्रेक्षकांनाही त्रास होतो,” असं दिलीप जोशी म्हणाले होते.
“याआधीही मी शो सोडल्याच्या अफवा होत्या, त्या पूर्णपणे खोट्या होत्या. आणि आता असं वाटतंय की दर काही आठवड्यांनी असित भाई आणि शोला कोणत्या ना कोणत्या प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यासाठी अशी गोष्ट पसरवली जातेय. अशा गोष्टी पुन्हा-पुन्हा घडताना पाहून वाईट वाटतं. पण शोला इतकं यश मिळतंय त्याचा कोणाला तरी हेवा वाटतोय, त्यामुळे ते या गोष्टी करत आहेत,” असं दिलीप जोशी यांनी म्हटलं होतं.