Taarak Mehta Ka Ooltah Chashma completes 17 years: ‘फिर भी दिल है हिंदूस्तानी’, ‘सर आँखो पर’, ‘क्या बात है’, ‘छोटासा घर’, ‘जरा हटके जरा बचके’, ‘हम सब एक है’, ‘मैंने प्यार किया’, अशा अनेक चित्रपटांत अभिनेते दिलीप जोशी यांनी काम केले आहे.
याबरोबरच त्यांनी काही मालिकांमध्येदेखील काम केले. मात्र, त्यांना ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतून संपूर्ण देशभरात ओळख मिळाली. २००८ साली ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका सुरू झाली. या मालिकेत दिलीप जोशी यांनी जेठालाल ही भूमिका साकारत आहेत. जेठालाल आणि दया ही जोडी घराघरांत पोहोचली.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेला झाली १७ वर्षे पूर्ण
गोकुळधाम सोसायटीमधील जेठालाल, दया, तारक मेहता, बबिता, अय्यर, अंजली, भिडे मास्तर, माधवी भाभी, अब्दुल, पोपटलाल, टप्पू सेना अशा सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आता या मालिकेला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने सगळ्या कलाकारांनी एकत्र येत आनंद साजरा केला. या सेलिब्रेशनसाठी कलाकार त्यांच्या जवळच्या व्यक्तींसह हजर होते.
जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांनी त्यांच्या पत्नीसह हजेरी लावली होती. दिलीप जोशी यांच्या पत्नीने साध्या लूकमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. व्हायरल भयानीने दिलीप जोशी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिलीप जोशी त्यांच्या पत्नीसह फोटोंसाठी पोज देताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत या जोडीचे कौतुक केले आहे.
“जेठाजी”, “मला जेठाजी खूप आवडतात”, “माझे सगळ्यात आवडते अभिनेते जेठाजी आहेत”, अशा काही कमेंट्स पाहायला मिळत आहेत; तर काहींनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही लोकप्रिय विनोदी मालिका आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवण्याची किमया करणारी, उत्तम शेजारी म्हणजे नेमके कसे असतात, याचे उदाहरण देणाऱ्या या मालिकेचा चाहतावर्ग मोठा आहे. या मालिकेतील सर्व पात्रे त्यांच्या वेगळेपणाने लक्ष वेधून घेतात. सुख-दुःखात एकमेकांना साथ देतात, एकमेकांच्या चुका सांभाळून घेतात, तर सोसायटीमधील एखाद्याचा आनंद वाटून घेतात, त्यामुळे ही मालिका लोकप्रिय ठरली आहे. आता या मालिकेला १७ वर्षे पूर्ण झाली असून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ने १८ व्या वर्षात पदार्पण केले आहे.
दरम्यान, गेल्या १७ वर्षांत अनेक कलाकारांनी मालिका सोडली आहे. यावर निर्माते असित मोदी म्हणालेले की, जोपर्यंत कथानक चांगले आहे तोपर्यंत कलाकारांनी मालिका सोडल्याचा इतका फरक पडत नाही.