गेल्या अडीच वर्षांपासून ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कन्यादान’ मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता ‘कन्यादान’ मालिकेतील वृंदा म्हणजे अभिनेत्री अमृता बने लवकरच बोहल्यावर चढणार आहे.

अभिनेत्री अमृता बने दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांची सून होणार आहे. अश्विनी एकबोटेंचा मुलगा शुभंकर एकबोटेबरोबर अमृता लग्नागाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. नुकताच तिचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम शेअर केला आहे.

हेही वाचा – ‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या

“अशु मेहंदी, बस डोली उठने की देरी हैं,” असं कॅप्शन लिहित तिने मेहंदी समारंभाचा व्हिडीओ शेअर केला आहे. अमृताने तिच्या हातावर मेहंदीतून प्रेमाचे खास क्षण रेखाटले आहेत. ‘अल्ट्रा मराठी बझ’ या युट्यूब चॅनलशी संवाद साधताना अमृताने तिच्या खास मेहंदीची थीम सांगितली.

अमृता म्हणाली, “तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, शुभंकर पुण्याचा आणि मी मुंबईची आहे. त्यानुसार मेहंदीची थीम घेतली. मेहंदीमध्ये फक्त पुणे-मुंबई नसून यामध्ये आमच्या प्रेमाच्या खास गोष्टी सुद्धा आहेत. उजव्या हातावर पुण्यातील खास गोष्टी रेखाटल्या आहेत. पुण्याचा अभिमान, पुण्याचं प्रतिक शनिवारवाडा, ज्या शिवनेरी बसने शुभंकर मला भेटायला येत होता ती बस, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटाचे इनिशियल लेटर ‘DDLJ’ आणि मग ‘पुण्याची सून’ असं उजव्या हातावर काढलं आहेत. तर डाव्या हातावर मुंबईतले खास क्षण काढले आहेत. मरीन ड्रायव्ह, मुंबई लोकल आणि मराठा मंदिर, हे सर्व डाव्या हातावर रेखाटलं आहे.”

हेही वाचा – Video: “आपल्या आई-वडिलांशिवाय…”, चाहत्याने हातावर काढलेला टॅटू पाहून शिव ठाकरेची प्रतिक्रिया, म्हणाला…

अमृता व शुभंकर हे शाहरुख खानने चाहते आहेत. दोघांनी पहिल्यांदा शाहरुखचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपट मराठा मंदिराला बघितला होता. त्यामुळे अभिनेत्रीने एका हातावर चित्रपटाचं नाव आणि दुसऱ्या हातावर मराठा मंदिर लिहिलं आहे.

दरम्यान, अमृता व शुभंकरची भेट ‘कन्यादान’ मालिकेतचं झाली होती. या मालिकेत दोघं ऑनस्क्रीन नवरा-बायकोचं काम करत आहेत. आता खऱ्या आयुष्यातही लवकरच दोघं नवरा-बायको होणार आहेत. उद्या, २१ एप्रिलला दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे.