International Women’s Day 2025: आज जागतिक महिला दिन. दरवर्षीप्रमाणे यंदाही ८ मार्चला जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. यानिमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखणीय काम करणाऱ्या महिलांचा गौरव केला जात आहे. या दिवशी महिलांची थोरवी, महिलांची गोडवी गायली जात असून सोशल मीडियावर महिलांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. जागतिक महिला दिनानिमित्ताने नुकतीच केदार शिंदे यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

केदार शिंदे यांनी पत्नी बेला शिंदे आणि मुलगी सना शिंदे यांच्याबरोबर पोस्ट शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. केदार शिंदे यांनी लिहिलं की, “आज जागतिक महिला दिन. प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात स्त्री ही अविभाज्य घटक असते. कारण जन्म देणारीच एक स्त्री असते. पुढे आयुष्यात अनेक स्त्रिया आपल्या आयुष्यात येतात. आईपासून सुरुवात जरी झाली तरी, मावशी, आत्या, आजी, काकू.. ते शाळा कॉलेजात शिक्षिका…पण पुन्हा एक वळण येतं जेव्हा लग्न होतं.”

“बेला माझ्या आयुष्यात येणं हा टर्निंग पॉइंट होता. मी एकांकिका स्पर्धेत धडपडणारा…अचानक संसाराची जबाबदारी अंगावर पडल्यावर, हातपाय मारू लागलो. माझ्या नाटक, मालिका, सिनेमाच्या प्रवासात अनेक चढउतार आले, येतायत, येतील…खंबीरपणे साथ देणारी ‘ती’ माझ्याबरोबर आहे. त्यानंतर मुलीच्या रुपात आयुष्यात आली ‘ती’..,सना शिंदे…तिने जबाबदारी बरोबरच मॅच्युअर बनवलं. आज माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं म्हणजे सना. आजच्या टेक्नॉलॉजी युगात अपग्रेट राहण्याचा मार्ग म्हणजे सना. या दोघी नसतील तर मी शून्य आहे. मी ३६५ दिवस त्यामुळेच महिला दिन साजरा करतो,” अशी सुंदर पोस्ट केदार शिंदे यांनी लिहिली आहे.

दरम्यान, केदार शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच त्यांचा नवा चित्रपट ‘झापुक झुपूक’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गेल्यावर्षी ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात केदार शिंदेंनी ‘झापुक झुपूक’ चित्रपटाची घोषणा केली होती. सूरज चव्हाणला घेऊन एक चित्रपट करणार असून या चित्रपटाचं नाव ‘झापुक झुपूक’ असणार, असं केदार शिंदे यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर डिसेंबर २०२४च्या अखेरीस चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला आणि नुकतंच चित्रपटाचं चित्रीकरण यशस्वीरित्या पूर्ण झालं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूरज चव्हाणसह ‘पिरतीचा वनवा उरली पेटला’ मालिकेतील इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, ‘अबीर गुलाल’ मालिकेतील पायल जाधव, ‘तुमची मुलगी काय करते’ मालिकेतील जुई भागवत आणि दीपाली पानसरे झळकणार आहेत. २५ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.