Kiran Mane Post on Hindi Language : राज्य शासनाच्या हिंदी सक्तीच्या निर्णयावरून राज्यात प्रचंड वाद निर्माण झाला आहे. राज्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांना इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवावी लागणार आहे. शालेय शिक्षणात पाचवी किंवा सहावीनंतर येणारा हिंदी भाषेचा विषय पहिलीपासूच शिकवण्याला अनेकांनी तीव्र शब्दांत विरोध दर्शवला आहे. राजकीय क्षेत्रासह कलाक्षेत्रातूनही या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
हेमंत ढोमे, समीर चौघुले, अरविंद जगताप यांनी सरकारच्या निर्णयावर पोस्टद्वारे त्यांचं मत व्यक्त केलं आहे. अशातच अभिनेते किरण माने यांनीही पोस्ट शेअर करत त्यांचं मत व्यक्त केलं आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात, “हिंदी सक्तीवर खूपच रान पेटलं आहे. हे बघून भारी वाटतं. तिसरी भाषा म्हणून हिंदीचा भार नकोच. पण त्याचवेळी हाही विचार करूया की, आपल्या मराठीत प्रमाणभाषेच्या सक्तीचं जे जोखड आहे, त्यातून ती कधी मुक्त होणार?”
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे, “आज मराठीप्रेमाचा उमाळा दाटून येऊन हिंदीला विरोध करणारे विद्वान अजूनही बोलीभाषेला ‘गावंढळ’ मानतात त्याचं काय? भाषेला तालेवार करू शकणार्या अनेक मौल्यवान शब्दांचा खजिना उकीरड्यावर फेकून तिला ‘अशुद्ध’ म्हणणं तुम्ही जोपर्यंत थांबवत नाही, तोपर्यंत तुमच्या हिंदीविरोधाला घंटा किंमत नाही. बहुजनांच्या रोजच्या व्यवहारातले, बोलण्या-चालण्यातले शब्द, शब्दप्रयोग हे स्वीकारण्यापेक्षा ‘टाकाऊ’ ठरवले जातात.”
किरण माने इन्स्टाग्राम पोस्ट
यापुढे त्यांनी म्हटलं, “‘आणि’ म्हणताना आनी, पाणी मागताना ‘पानी’ असा उच्चार आला की, नाकं मुरडली जातात. ‘प्रमाण’ वगैरे मानल्या गेलेल्या तथाकथित भाषेनं विटाळ मानल्यामुळं खरी रसरशीत मराठी बोली तिच्यापासून दूर निघून गेली आहे. तेच तेच शब्द वर्षानुवर्ष वापरून मराठी प्रमाणभाषा सपक-अळणी झाली आहे. म्हणून तर आजकाल तरूण पिढी मराठीत इंग्रजी, हिंदी शब्दांचा तडका मारून तिच्यात लज्जत आणायचा प्रयत्न करते.”
यानंतर ते पोस्टमध्ये म्हणतात, “तरूणाईत गाजलेली रिल्स पहा, नव्याण्णव टक्के ग्रामीण बोलीभाषेतच असतात. ‘खुपच छान’ म्हणण्यापेक्षा ‘लई भारी’ किंवा ‘नादखुळा’मध्येच मज्जा आहे. नाटकाचं नांव ‘शुभेच्छा’ असं असतं तर ते काहीतरीच वाटलं असतं, पण ‘ऑल द बेस्ट’ कसं भन्नाट वाटतं. तथाकथित ‘शुद्ध’ भाषा हळूहळू आचके देत कायमची मरणार आहे. मायबोलीत भेदभाव करणार्यांनी स्वत:ची पोरं मात्र कॉन्व्हेन्टमध्ये शिकवली आहेत.”
यापुढे किरण माने म्हणतात, “अनेक विद्वानांचे प्रमाणभाषेतील रूक्ष ग्रंथ मराठी माणसांनाच समजत नाहीत. त्यामुळे ते हळूहळू कालबाह्य होणार आहेत. मराठी माणूस एटीएममध्ये पैसे काढायला गेला तरी वापराची भाषा इंग्रजी निवडतो. कारण त्यातल्या मराठी शब्दांचे अर्थच कळत नाहीत. आपण आपले विचार मांडताना साध्यासोप्या बोलीभाषेत मांडले तर ते लेखन भावते, मना-मेंदूपर्यंत पोहोचतं आणि त्यात आशयघनता असेल तर चिरकाल टिकते.”
हेही वाचा
यानंतर त्यांनी म्हटलं, “तुकारामाच्या गाथेसारखे! बहिणाबाईंच्या कविता आणि अण्णाभाऊ साठेंच्या कथा-कादंबऱ्या एकदा वाचल्या की, काळजात घर करून राहतात. कारण त्यात बहुजनांची बोली आह. त्यामुळं माझ्या भावाबहिणींनो, हिंदीबरोबरच मराठी प्रमाणभाषेच्या सक्तीलाही झुगारून लांब फेकून द्या, जी पिढ्यानपिढ्यांनी अशुद्ध ठरवली, तीच खरी ‘समृद्ध’ आहे हे मेंदूत कोरून घ्या.”