आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्यासाठी चाहते मंडळी बराच प्रयत्न करतात. एखाद्या गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक वाहनांद्वारे प्रवास करताना कलाकार दिसले की चाहते त्यांना घेरतात. हे चित्र बऱ्याचदा पाहायला मिळत. चाहत्यांचं मिळणारं प्रेम पाहून कलाकारही भारावून जातात. पण काही कलाकारांना चाहत्यांबाबत विचित्र अनुभव आले असल्याचं ऐकायला मिळतं. असंच काहीसं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबबाबत घडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याबाबत खुलासा केला.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे शिवालीला एक वेगळीच ओळख मिळाली. या कार्यक्रमातील सुप्रसिद्ध कलाकारांपैकी एक म्हणजे शिवाली. शिवाली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये साकारत असलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतात. विशेष म्हणजे प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात ती यशस्वी ठरली. आता तिच्या चाहतावर्गामध्ये प्रचंड वाढ झाली आहे.




चाहत्यांचं आपल्यावर असणारं प्रेम पाहून शिवाली भारावून जाते. मात्र तिला एकदा एका विचित्र प्रसंगाचा सामना करावा लागला. ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबत भाष्य केलं. चाहत्याच्या एका विचित्र अनुभवाबाबत तिने सांगितलं. शिवाली म्हणाली, “ट्रेनमधून प्रवास करत असताना एक काकू मला भेटल्या”.
आणखी वाचा – दोन विवाहित अभिनेत्यांबरोबर होतं श्रीदेवी यांचं अफेअर, दोघांच्याही पत्नींना कळलं अन्…
“माझा फोन नंबर घेण्यापासून ते माझ्या कुटुंबियांची त्यांनी विचारपूस केली. मी माझा फोन नंबर देण्यासाठी त्यांना नकार दिला. तरीही त्या काही ऐकल्या नाहीत. त्यांनी माझा फोन नंबर माझ्याकडून जबरदस्ती घेतला. हा प्रकार माझ्यासाठी खूप विचित्र होता. माझा फोन नंबर घेतल्यानंतर त्यांनी कधी मला असा त्रास दिला नाही”. शिवाली सध्या मराठी चित्रपटांमध्येही काम करताना दिसत आहे.