छोट्या पडद्यावरील मुलगी झाली हो ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. याच मालिकेत माऊ हे पात्र साकारलेली अभिनेत्री दिव्या पुगावकर कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. आता दिव्या एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत दिव्या आनंदीच्या भूमिकेत दिसते आहे. या मालिकेत ती एका घटस्फोटित महिलेची भूमिका करत आहे. नुकतंच तिने तिच्या पात्राबद्दल भाष्य केले.

अभिनेत्री दिव्या पुगावकरने नुकतंच ई-टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत दिव्याने तिचे मालिकेतील पात्र आणि घटस्फोटित महिला याबद्दल स्पष्ट मत मांडले. यावेळी तिने तिच्या मनातील भावनाही व्यक्त केला.
आणखी वाचा : “या प्रवासात काही अतिशय खडतर क्षण आले पण…”, ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“या मालिकेत माझी भूमिका वेगळी आहे. मलाही ती भूमिका फार आवडतेय. कारण आनंदीला देखील स्वतःची मतं आहेत, जशी मला आहेत. पण मला या पात्रासाठी मनाची तयारी करावी लागली. मी पहिल्यांदाच अशी भूमिका करते. त्यामुळेच माझ्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे”, असे दिव्या म्हणाली.

“आपल्याकडे घटस्फोटित मुलीकडे प्रत्येकजण वेगळ्या नजरेने बघतो. प्रत्येकाच्या मनात तिच्याबद्दल वेगळा दृष्टिकोन असतो. पण मला वाटतं की लोकांनी घटस्फोटित मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि त्यांच्याबद्दलचे विचार बदलायला हवेत. अनेकदा लोक गृहीत धरतात की जर एखादी स्त्री घटस्फोटित असेल तर तिने तिच्या भूतकाळात नक्कीच काही वाईट गोष्टी केल्या असतील. तीच वाईट चालीची आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे.

घटस्फोटामुळे पती-पत्नी दोघांवरही परिणाम होतो. याला कधीही एक व्यक्ती जबाबदार नसते किंवा फक्त स्त्रिया याला नेहमीच जबाबदार नसतात. ‘घटस्फोटित’ हा टॅग काढून टाकता आला पाहिजे. घटस्फोटित महिलेलाही तिचं आयुष्य स्वतंत्ररित्या जगण्याचा अधिकार आहे. तिलाही तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचा अधिकार आहे”, असा सल्लाही दिव्याने दिला.

आणखी वाचा : “माझ्या खोलीत ये आपण…” ‘तारक मेहता…’मधील प्रसिद्ध अभिनेत्रीचा निर्मात्यांवर गंभीर आरोप, धक्कादायक खुलासा करत म्हणाली “मी गरोदर असताना…”

आनंदीला तिच्या घरी त्याच दुःखाचा सामना कसा करावा लागतोय हे या मालिकेत दाखवण्यात आलं आहे. या कार्यक्रमात अशा महिलांचं वास्तव आणि लोकांनी त्यांची मानसिकता कशी बदलली पाहिजे याचं चित्रण करण्यात येणार आहे. मला खात्री आहे की हा शो पाहिल्यानंतर घटस्फोटित महिलेबद्दलची प्रत्येकाची मानसिकता बदलेल, असे दिव्याने म्हटले.