सध्या मनोरंजनासाठी अनेक माध्यमं उपलब्ध झाली आहेत. नाटक, चित्रपट, मालिका ही आधीची माध्यमं तर आहेत. पण त्यामध्ये भर पडली वेब सीरिजची. वेब सीरिज हे माध्यम सध्याचं आघाडीचं माध्यम म्हणायला काही हरकत नाही. पण त्यापाठोपाठ प्रेक्षकांना अधिक खिळवून ठेवणारं माध्यम म्हणजे मालिका. दररोजच्या दगदगीच्या जीवनात थोडासा विरंगुळा म्हणून एखादी तर मालिका पाहिलीच जाते. त्यामुळे प्रेक्षक व मालिकांमध्ये एक अतूट नातं निर्माण झालं आहे. कितीही जुनी मालिका असो किंवा नवीन मालिका प्रेक्षक ती आवर्जून पाहतात. जरी निश्चित केलेल्या वेळेत आवडती मालिका बघता आली नाही, तरी आता वाहिन्याच्या अ‍ॅपवर प्रवास करतानाही मालिका पाहिली जाते. मालिकांमधील कलाकारांविषयी प्रत्येकालाच माहित असतं. ते काय काम करतात?, ते कसं काम करतात?, भूमिकेसाठी ते कसा अभ्यास करतात? याविषयी ते विविध एंटरटेनमेंट वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगतात. पण मालिकेच्या पडद्यामागे कसं काम चालतं? किती मेहनत असते? कलाकारांप्रमाणेच त्यांचं देखील काम असतं का? यानिमित्ताने आज आपण अभिनेत्री, निर्माती शर्मिष्ठा राऊत हिच्याशी बातचीत केली आहे.

‘जुळून येती रेशीमगाठी’मधली प्रेमळ पण पटकन चिडणारी अर्चना, ‘उंच माझा झोका’ मधली आलवणातली ताई काकू, ‘सारं काही तिच्यासाठी’ मधली संध्या तसंच ‘बिग बॉस मराठी’मध्ये वाईल्ड कार्डद्वारे एंट्री मिळवणारी आणि ‘फु बाई फू’ मध्ये विनोदी भूमिका साकारणारी शर्मिष्ठा राऊत हे नाव टीव्ही प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचलं आहे. अभिनयाच्या माध्यमातून विविध भूमिकांना न्याय देणारी शर्मिष्ठा आता निर्मितीच्या क्षेत्रात उतरली आहे. पडद्यावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी शर्मिष्ठा आता पडद्यामागची भूमिका साकारताना दिसते आहे. तिची पहिली निर्मिती असलेली ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अशातच तिची अलीकडेच दुसरी नवीन मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’ प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. पण तिला निर्माती का व्हावंसं वाटलं, काय आव्हानं आहेत या क्षेत्राची, काय कामं असतात हे जाणून घेण्यासाठी शर्मिष्ठाशी केलेली बातचीत…

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
Chinmay Mandlekar said siddharth chandekar got injured during natak
“डोक्यातून रक्त वाहत होतं आणि…” जखम झाल्यावरही ‘त्या’ अभिनेत्याने सुरूच ठेवलं नाटक; चिन्मय मांडलेकर म्हणाला…
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास

शर्मिष्ठाच्या मते निर्मिती म्हणजे काय? या क्षेत्रात सुरुवातीलाच एखाद्या मालिकेची निर्मिती का केली?

निर्मिती क्षेत्र काय याचं उत्तर मला शब्दशः अजून माहित नाही. मात्र माझ्या मते, एखादी कला, एखादं उत्पादन किंवा कल्पना या जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करता तेव्हा एखाद्या गोष्टीची निर्मिती होतं असते. कधी कधी निर्मिती गरजेनुसार सुद्धा होतं असते. आता आपल्याला मनोरंजनाची गरज आहे. म्हणून मालिका, चित्रपटांची, नाटकांची निर्मिती करत असतो. पण अजूनही मी सांगू शकत नाही, निर्मिती म्हणजे नक्की काय? कारण मीही त्या अजून शाळेमध्ये शिकत आहे.

पहिल्यांदाच मालिकेची निर्मिती करण्याबाबतीत, तर माझं मालिकाविश्वावर विशेष प्रेम आहे. नाटक, चित्रपट आणि मालिका हे तीन माध्यम आहेत. या तीन पैकी दोन माझी लाडकी माध्यम आहेत ते म्हणजे नाटक व मालिका. आतापर्यंत जवळजवळ मी १७ ते १८ वर्षे मालिकाविश्वात काम केलं आहे. त्यामुळे मला मालिका क्षेत्रातील जी गणितं आहेत, ती हळूहळू कळू लागली होती. पण अजूनही मी म्हणेन की, ती मला पूर्णपणे कळलेली नाहीत. मला सगळं कळतंय हे मी अजिबात कोणत्याही बाबतीत म्हणणार नाही. ना अभिनयाच्या बाबतीत, ना निर्मितीच्या बाबतीत. मी अजूनही शिकतं आहे. कारण विद्यार्थी दशा ही खूप चांगली असते. मला येतंय, मला जमलं असं म्हटल्यानंतर सगळं तिथेच थांबून जात, ती वाढ थांबते. म्हणून मालिकाविश्व हे माझं दुसरं प्रेम असल्यामुळे मला असं वाटलं पहिल्यांदा एखादी मालिका करावी. दुसरं बघायलं गेलं तर मालिकेत थोडी जोखीम कमी आहे. तुमचे एपिसोड्स बनतात, त्याचे पैसे चॅनल तुम्हाला देतं. हे तुम्ही कशा पद्धतीने बसवू शकता, यात तुमचं कसब असतं. चित्रपटाच्या निर्मितीत देखील तसंच आहे. तुमचं एक बजेट ठरतं आणि मग त्या बजेटमध्ये तुम्ही कसं बसवता याच्यात तुमचं कसब आहे. पण चित्रपट बघायला प्रेक्षक येतील की नाही? तो चित्रपट चालेल की नाही? जितके पैसे त्यात गुंतवले आहेत त्याची रिकव्हरी कशी होईल? अनेक मार्ग आहेत, पण अजून शाश्वती पाहिजे तशी मिळत नाहीये. किमान तोटा जरी झाला तरी तो कमी होईल. नफा झाला तर तो होईलच, अशा दोन्ही अटी इथे खुल्या आहेत. त्यामुळे निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी मालिका माध्यम निवडलं.

मालिका निर्मात्याचं नेमकं काय काम असतं? पैसे गुंतवण्यापलीकडचं काम…

खूप काम असतं ही मुलाखत अपुरी पडेल तेवढं काम असतं. कलाकारांची १२ तासांची शिफ्ट असते. आज मी अभिनेत्रीच्या भूमिकेत आहेच, पण मी निर्माती म्हणूनही उभी राहिली आहे. निर्मात्याला २४ तास काम करायचं असतंच. कारण त्याला चॅनल सुद्धा सांभाळायचं आहे. तिकडच्या लोकांना सुद्धा सांभाळायचं असतं. तांत्रिक बाजू देखील बघायची असते. पोस्ट प्रोडक्शन नावाचा पण एक भाग असतो. शूटिंग झाल्यानंतर एपिसोड एडिटला जातो. मग तो म्युझिकला जातो. हे मी फार ढोबळ मानाने सांगितेय. त्याच्याही आतमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. कलर कलेक्शन केलं जातं, असे अनेक विधी केले जातात. त्यानंतर तो सॅटेलाइट डिजिटलच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचतो. पण सॅटेलाइट डिजिटलपर्यंत पोहोचवण्याचं काम असतं. त्यात मिक्स-अनमिक्स हे मी टेक्निकल शब्द वापरतेय, जे या क्षेत्रात आहेत त्यांनाही कळेल. सतत सगळं चालू असतं. पदोपदी खूप आव्हान येत असतात. शिवाय प्री-शूट जरी म्हणालो तरी आपल्याला एक बजेट असतं, त्या बजेटमध्ये आपण कथेला साजेसं कोणतं लोकशन आणू शकतो, त्याच्यानंतर दिवसाचा खर्च, युनिटमध्ये ५० ते ६० लोक असतात. त्या ५० ते ६० लोकांच्या जवळजवळ १०० समस्या असतात. काहीही समस्या असतात. त्यांच्या कौटुंबिक समस्या असतात. कारण ते जर माझं कुटुंब आहे, मी जास्त त्यांच्याबरोबर राहते तर मला त्यांचे प्रश्न सोडवणं देखील तितकंच गरजेचं वाटतं. जे मी माझ्या टीमबरोबर करत असते. मला जितकं जमेलं तितकी मी मदत करत असते. त्यांच्या वैयक्तिक समस्या, त्यांचे मूड, त्याच्यानंतर त्यांची होणारी कधीकधी चिडचिड, हे सगळं करावं लागतं आणि कॅप्टन ऑफ द शिफ्ट म्हणून सगळं सांभाळावं लागतं.

माझ्या खालोखाल असतो तो प्रोजेक्ट हेड. तो माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबरीने काम करत असतो. या सगळ्या गोष्टी असतात. आपण म्हणतो, नुसती पैशांची गुंतवणूक केली म्हणजे झालं. असं नाही. दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे कमावलेले पैसे असतील तरी त्याची यात गुंतवणूक करणं धोक्याचं आहे. मी निर्माती झाली तर माझ्याकडे अचानक पैसे आले का? तर नाही. माझ्याकडे अचानक पैसे वगैरे आले नाहीत. आम्ही बँकांमधून कर्ज घेतलं आहे. फायनान्सर (भांडवलदार)कडून कर्ज घेतलं आहे. जे आम्हाला व्याज दरावर परत करायचं आहे आणि ते लाखांमध्ये नसतं कोटींमध्ये असतं. कारण जर एखादं जहाज चालवायचं आहे तर त्याला एवढा पैसा नक्की लागतो. मग ते पैसे कुठे थांबवायचे? किती गुंतवायचे? परतफेड करायची तेवढीच ऐपत आहे का? या सगळ्या गोष्टी आहेत. त्यात पैसे उचलताना कधी-कधी घर गहाण ठेवावं लागतं. तुमची संपत्ती गहाण ठेवावी लागते. कारण बँकेचे व्याजदर फायनान्सर पेक्षा कमी असतं. अशा अनेक गोष्टी आहेत. ज्यांच्याकडे पहिल्यापासून पैसे आहेत आणि ते यात गुंतवणूक करत आहेत. तरीही त्यांना या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. गुंतवलेले पैसे एकदा गेले की गेले.

मला काही अचानक लॉटरी लागली नाही. मी आताही मालिका करतेय, त्याच्यासाठी फायनान्सरकडून पैसे घेतले आहेत. घरावर थोडं कर्ज घेतलं आहे. केवळ याच्यासाठी की, एक चांगलं प्रोजेक्ट देता यावं. मला निर्माती म्हणून काही गोष्टी करायच्या होत्या. माझा स्वतःवर विश्वास आहे की, मी काहीतरी चांगलं डिलिव्हर नक्की करू शकते. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात एक पायरी वर चढायची असेल तर धोका स्वीकारायला लागतोच. स्वतःवर विश्वास ठेवून तो धोका स्वीकारायचा. मी म्हणणे की, माझ्याबरोबर मानसिक दृष्ट्या धोका शेअर करायला, माझे पती तेजस देसाई आहेत. आम्ही दोघांनी मिळून एकमेकांचं स्वप्न पूर्ण केलं. त्याचं स्वप्न होतं व्यवसाय करायचं. पण कोणता करू हे त्याला कळतं नव्हतं. माझं ठरलेलं होतं, कोणता व्यवसाय करायचं. जेव्हा आम्ही भेटलो आणि ठरवलं तेव्हा मी म्हटलं, मी तुझं स्वप्न १०० टक्के पूर्ण करू शकते. आपण हे करूया. मग ठरवलं खूप साऱ्या फायनान्सरना भेटलो. त्यांच्याकडून व्याजावर पैसे घेतले आणि आता सगळं सुरळीत सुरू आहे.

फोटो सौजन्य – शर्मिष्ठा राऊत इन्स्टाग्राम

कलाकारांप्रमाणेच मालिकेसाठी निर्माते देखील दररोज काम करतात का?

कलाकारांपेक्षा जास्त काम असतं. मी दोन्ही आयुष्य जगतेय. कलाकारांचं आयुष्य वेगळं असतं. १२, १३ तास, कधी डे-नाईट प्रमाणे शूट करावं लागतं. मी कायम म्हणते की, जर निर्माता जगला तर मी जगणार आहे. तो बुडला तर मी बुडणार आहे. त्यामुळे मला त्याला मदत करणं फार गरजेचं असतं आणि ती मदत करता करता बरेचदा असं होतं की, आपल्याकडे पटकथा नाहीये, एपिसोड लवकर संपलाय, अजून भरून काढायचा आहे किंवा महाएपिसोड आला, जास्त शूट करायचं आहे किंवा कोणत्या दुसऱ्या कलाकार एडजस्टमेंट आहे, म्हणून आपल्या रात्री शूट करावं लागणारे, असं बऱ्याच गोष्टी आहेत. एवढं सुद्धा करूनही कधी-कधी काय असतं की, मानधनाची जी अपेक्षा असते ती कधी मिळते, कधी नाही मिळतं. त्यात आपल्याला घर चालावायचं आहे. मी असं म्हणणे की, कलाकार आणि निर्माते एकाच नाण्यांच्या दोन बाजू आहेत. जे खरंतर एकच नाणं आहे. पण त्याच्या दोन बाजू वेगवेगळ्या आहेत आणि त्या दोन्ही बाजू खऱ्या आहेत.

कलाकारांची निवड ही मानधनानुसार की अनुभवानुसार केली जाते?

कथेनुसार कलाकारांना घेतलं जातं. एखाद्या गोष्टीमध्ये आई, सून, मुलगा आहे. सूनेचं वैशिष्ट्यम म्हणजे ती थोडी चिडकी आहे. सासू देखील चिडकी आहे किंवा वसावसा अंगावर येणारी आहे. तर अशा सासूच्या पात्रासाठी मी मृणाल कुलकर्णींना घेऊ शकत नाही. म्हणजे मला तिकडे कोणीतरी वेगळं पाहिजे. मग तिथे मला हर्षदा खानविलकरांसारखी कोणती तरी पाहिजे. त्यामुळे कथानकानुसार कलाकारांची निवड केली जाते. पैसा हा मुद्दा महत्त्वाचा आहेच. पण तो नंतर येतो. आधी कथानक पाहिलं जाते.

मालिकेच्या कॉन्ट्रॅक्ट विषयी एका अभिनेत्रीने खंत व्यक्त केली होती. तुम्हाला जेलमध्ये पाठवणार आहे, पण तिथे आनंदी राहायचं अशा प्रकारची कॉन्ट्रॅक्ट असतात, असं त्या अभिनेत्रीचं म्हणणं होतं. याविषयी शर्मिष्ठा म्हणाली…

१७ ते १८ वर्षांच्या करिअरमध्ये माझ्या वाट्याला असं काहीही, कधीही आलं नाही. मी तर असं बघितलं नाहीये, त्यामुळे यावर मी काही भाष्य करू इच्छित नाही. तिच्या प्रवासात घडलं असेल. पण नशीबाने मला जे माझे निर्माते मिळाले, दिग्दर्शक मिळाले ते खूप उत्तम मिळाले. मुळात मी प्रोडक्शनची आर्टिस्ट आहे, असं मी स्वतःला कायम म्हणते. ओके आता हे करायचं आहे, हे करू या. आता हे नाही करायचं, ओके हे नको करूया. ही एडजस्टमेंट पाहिजे तुम्हाला, मी करून देते, अशा पद्धतीने मी काम करणारी व्यक्ती आहे. मुळात मला ते करायला आवडतं. हे म्हणजे हातात हात घालून काम करण्यासारखं आहे. जर प्रोडक्शनला काही अडचण असेल, त्यांना मदतीची गरज असेल, त्यावेळेस मी तिथे उपस्थित राहिली. तर मग मला जेव्हा अडचण येईल तेव्हा ते पण मला एडजस्ट करतील ना. हे गिव्ह अ‍ॅन्ड टेक आहे.

निर्मिती क्षेत्रातील एक आवडणारी गोष्ट…

मॅनेजमेंट करणं. मला सगळ्यांना मॅनेज करायला खूप आवडतं. एखाद्या कुटुंबाप्रमाणे त्यांना जपणं हे मला भयानक आवडतं. आता माझ्याकडे जेवण घरगुती पद्धतीचं देतो. म्हणजे घरगुती बाई शोधतो त्यांच्याकडून जेवण येतं. सेटवरच्या कलाकारांची दोन माफक अपेक्षा असते की, उत्तम जेवण असू देत आणि शौचालय नीट असू देते. कारण आपण कुठेही शूट करत असतो. नशीबाने मला माझ्या दोन्हीही टीम अत्यंत चांगल्या मिळाल्या आहेत. आता मी एका चित्रपटाची निर्माती केली. तिथे आम्ही सहा जण निर्माते आहोत. तिथे सुद्धा कलाकारांची टीम उत्तम होती. मी नशीबवान आहे मला अशा कलाकारांची टीम मिळाली.

अभिनय की निर्मिती कोणतं क्षेत्र आव्हानात्मक आहे?

दोन्ही क्षेत्र आव्हानात्मक आहेत. नाण्यांच्या दोन बाजू आहेत. कधीही त्या एकमेकांना भेटत नाहीत. पण त्या नाण्याला किंमत असते. जर नाण्यावर छापा असेल, पण त्याच्या दुसऱ्या बाजूला काटा नसेल तर ते बाजारात नाणं चालणारच नाही. त्यामुळे नाण्यावर छापा व काटा असणं जितकं महत्त्वाचं तितकंच अभिनय व निर्मिती क्षेत्र या दोन्ही गोष्टी प्रचंड महत्त्वाच्या आहेत.

फोटो सौजन्य – शर्मिष्ठा राऊत इन्स्टाग्राम

मालिकेची निर्मिती की चित्रपटाची निर्मिती काय आवडतं?

दोन्हीकडे मला मजा आली. एक, पूर्ण वेळ काम चालणार आहे. कारण मालिका ही बरेच वर्ष चालते. तिथे सतत काम करायचं असतं. हे काम करता करता रुटीन सेट होऊन जात. चित्रपटाचं वेगळं असतं. चित्रपटाचं शूट एका महिन्याचं असतं. त्यामुळे बजेट आटोक्यात ठेवून ते करायचं असतं. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही की तो चित्रपट वाया जातो. मग अशा परिस्थितीत रिकव्हरी कुठून करणार? चॅनलला चित्रपट विकल्यानंतर त्याच्यातून पैसे मिळतात. पण ज्या गोष्टीसाठी आपण चित्रपट बनवला असतो की, तो आता जबरदस्त चालला पाहिजे. लोकांनी कौतुक केलं पाहिजे. ते होतं नाही. चित्रपटाचं गणित फार वेगळं असतं.

निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी ‘या’ गोष्टी ध्यानात ठेवा…

निर्मिती क्षेत्रात येण्यासाठी पैसा हा महत्त्वाचा असतोच. पण त्यापलीकडे संयम ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते. शिवाय चिकाटी, जिभेवर साखर, डोक्यावर बर्फाची लादी या सगळ्या गोष्टींची गरज आहे.

दरम्यान, शर्मिष्ठा राऊतची निर्मिती असलेला ‘नाच गं घुमा’ हा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, आशा ज्ञाते, सारंग साठ्ये अशी मराठीतील प्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी असलेला चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.