Milind Gawali : कोणत्याही कलाकारासाठी त्याला मिळणारा पुरस्कार ही त्याच्या कामाची पावती असते. कलाकाराच्या कामाचं कौतुक म्हणून त्याला पुरस्कार दिले जातात आणि या पुरस्कारांमुळे कलाकारांनाही काम करण्यास अधिक हुरूप येतो. पुरस्कार हे प्रत्येक कलाकाराला हवेच असतात. यासाठी ते जीवापाड मेहनत घेताना दिसतात. मात्र असा एक कलाकार आहे, ज्याला पुरस्कार नको म्हणून त्याने ते फेकून दिले. हो हे खरं आहे आणि हा कलाकार म्हणजे मिलिंद गवळी.

“पुरस्कार फेकून देण्याची वेळ आलेली कारण…”

‘आई कुठे काय करते’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले अभिनेते मिलिंद गवळी यांनी आजवर अनेक मराठी चित्रपट व मालिकांमधून आपल्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. मात्र एके दिवशी त्यांच्यावर हे सगळे पुरस्कार फेकून देण्याची वेळ आली होती. याबद्दल स्वत: मिलिंद गवळींनीच सांगितलं आहे. लोकमत फिल्मीशी साधलेल्या संवादात त्यांनी या पुरस्कारांबद्दल भाष्य केलं.

“एके दिवशी माझ्याकडे काम नव्हतं आणि…”

यावेळी त्यांनी पुरस्कारांबद्दलच्या आठवणी सांगताना असं म्हटलं की, “मी ठाण्यामध्ये राहायला आल्यानंतरचे हे सगळे पुरस्कार आहेत. माझे काही जुने पुरस्कार अंधेरीच्या घरात आहेत. त्याच्याआधीही मला खूप पुरस्कार मिळाले आहेत. मी अनेक चित्रपट आणि अनेक मालिका केल्या ज्यासाठी मला पुरस्कार मिळाले. पण एकेदिवशी माझ्याकडे काम नव्हतं आणि मला काम मागायची सवय नाही. तर खूप वैतागून या पुरस्कारांचा काय फायदा जर माझ्याकडे कामच नाहीये.”

“मला फक्त जीवन गौरव पुरस्कार हवा आणि तोही मरणोत्तर”

यापुढे ते म्हणाले की, “आमच्याकडे तेव्हा कामाला मावशी यायच्या त्यांना म्हटलं हे सगळे पुरस्कार घेऊन जा. मी त्यांना म्हटलं की मी हे सगळं टाकूनच देणार आहे. मला नको पुरस्कार. मला फक्त जीवन गौरव पुरस्कार हवा आहे आणि तोही मरणोत्तर. बरेचसे पुरस्कार मी लपवून ठेवले. माझ्याकडे पुरस्कार आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या कामानिमित्त मिळताच असतात. पण मला वाटतं मायबाप रसिकांचं प्रेम, टाळ्या, कौतुक ते खरे पुरस्कार आहेत. कधीतरी नवीन मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार द्यावेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिलिंद गवळी लवकरच ‘झापुक झुपूक’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान, मिलिंद गवळी लवकरच ‘झापुक झुपूक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. येत्या २५ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यात मिलिंद गवळींसह सुरज चव्हाण, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर आदी कलाकार आहेत. चित्रपटात मिलिंद गवळींनी जुई भागवतच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.