Muramba Serial New Promo : ‘मुरांबा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. नुकताच या मालिकेने सात वर्षांचा लिप घेतला आहे. लिपनंतर रमा-अक्षयमध्ये पुन्हा दुरावा आल्याचे पाहायला मिळते. अशातच आता या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला असून यामध्ये लिपनंतर पहिल्यांदाच अक्षय व रमा एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीने सोशल मीडिया पेजवरून ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोला “दुरावा संपून रमा-अक्षयचं होईल का मनोमिलन…?” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये आरोही स्पर्धेसाठी तिच्या वडिलांची म्हणजेच अक्षयची वाट पाहत असते आणि म्हणते की, “अरे कुठे गेला हा बाबा.” परंतु, अक्षय ट्रॅफिकमध्ये अडकला असतो आणि त्यामुळे त्याला पोहोचायला उशीर होतो.

रमा-अक्षयचं होईल का मनोमिलन?

अक्षयला यायला उशीर होत असल्याने आरोही त्याची वाट पाहात असते, तेवढ्यात तिथे असलेल्या रमाला आरोही एकटीच आहे हे लक्षात येतं. ती म्हणते, “ही मुलगी एकटीच”, तेवढ्यात स्पर्धा सुरू होणार असल्याने रमाच आरोहीचा हात धरून तिच्याबरोबर धावयला लागते. त्यावेळीच तिथे अक्षय पोहोचतो आणि म्हणतो “आरोही कोणाबरोबर धावतेय” आणि तोसुद्धा आरोहीचा हात धरून धावायला लागतो. तेव्हाच अक्षय व रमाची नजरानजर होते आणि सात वर्षांनंतर ते पहिल्यांदाच एकमेकांना पाहात असतात. परंतु, आरोहीसाठी ते न थांबता स्पर्धेत धावत असतात.

आरोही गेली सात वर्षे तिच्या वडिलांबरोबर राहात आहे, पण रमा मात्र तिच्या नवऱ्यापासून व सात वर्षांच्या लेकीपासून दूर असते. ती पाचगणीत राहात असते आणि तिला आरोहीच तिची लेक आहे हेसुद्धा माहीत नसतं. नुकत्याच प्रसारित झालेल्या मालिकेच्या भागात आरोही पहिल्यांदाच रमाला भेटताना दिसली. यावेळी तिने रमाला आई म्हणून हाकही मारली होती.

दरम्यान, आरोहीच्या निमित्ताने रमा व अक्षय सात वर्षांनंतर पहिल्यांदाच एकमेकांसमोर आले असून लेकीसाठी ते एकत्र येतील का? त्यांच्यातील दुरावा संपून त्यांचे मनोमिलन होईल का हे मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.