Sheetal Kshirsagar Shares Experience: ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेचे शूटिंग आता संपले आहे. वर्षभराहून अधिक काळ या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता लवकरच ही मालिका निरोप घेणार आहे.

नवरी मिळे हिटलरला मधील एजे-लीला ही पात्रे लोकप्रिय ठरली. तितकीच मालिकेतील इतर पात्रांनादेखील मोठी प्रसिद्धी मिळाली. आजी, दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती, किशोर, प्रमोद, कालिंदी, रेवती, यश, विश्वरुप या आणि इतर सर्वच पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी कलाकारांनी विविध मुलाखती तसेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. प्रेक्षकांप्रमाणेच कलाकार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

‘नवरी मिळे हिटलरला’ मधील कालिंदी काय म्हणाली?

आता या मालिकेत लीला व रेवतीची आई म्हणजे कालिंदी ही नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळाली होती. रेवतीवर खूप प्रेम करणारी मात्र लीलाचा राग करणारी कालिंदीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले. अभिनेत्री शीतल क्षीरसागरने ही भूमिका साकारली आहे. आता एका मुलाखतीत त्यांनी नवरी मिळे हिटलरला या मालिकेविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठी आपला कट्टाबरोबर बोलताना शीतल क्षीरसागर म्हणाली, “मी आताच माझ्या दिग्दर्शकांना हेच म्हणत होते की तोच तर दिवस होता की आपण वाचनासाठी या सेटवर भेटलो होतो. या सेटवर आम्ही पहिल्या दिवशी वाचनासाठी भेटलो होतो. अगदी दिग्दर्शकासह मला सर्वजण अनोळखी होते. दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाडांबरोबर मी याआधी काम केलं नव्हतं. पण, या निमित्ताने मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. ते इतके उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत की त्यांच्यांमुळे मला कालिंदी सापडली.”

“कालिंदी सापडणं हा माझ्यासाठी आनंदाचा ठेवा आहे. त्यामुळे नवरी मिळे हिटलरला ही मालिका खास असणार आहे. कारण- मला फक्त आणि फक्त सुखद आठवणी मिळाल्या आहेत. मी कालिंदीचे विशेष आभार मानते. तिने मला माझ्या इतक्या चांगल्या कलाकारांबरोबर उत्कृष्ट प्रवास घडवला. उद्या कोणी इथे आलं तर तर सगळं सुनसान वाटेल. पण, मला वाटतं की प्रत्येक वास्तू ही तिथल्या माणसांमुळे जिवंत होत असते. मला खात्री आहे की जरी हा सेट उद्या दुसऱ्या कोणाचा झाला, तरी आम्ही आमची थोडीसी छाप सोडली आहे. जसा आम्हाला हा सेट आठवत राहिल. तशी या सेटलासुद्धा आमची कधीतरी अधूनमधून आठवण येत राहिल, याची आम्हाला खात्री आहे”, असे म्हणत अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.