Nikki Tamboli Talk About Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल. या शोमध्ये हे दोघे एकत्र आले. शोमध्ये ते एकमेकांना पाठिंबा देताना दिसले. ‘बिग बॉस मराठी ५’ नंतरच निक्की आणि अरबाज यांच्यातील प्रेमाच्या नात्याची सुरुवात झाली.

अशातच निक्कीनं मला बॉयफ्रेंड हवा होता, म्हणूनच मी ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभाग घेतला असल्याचं म्हटलं आहे. मला शोमध्ये बॉयफ्रेंड भेटला तरच मी येईन असं मेकर्सना सांगितलं होतं, असंही तिनं म्हटलं आहे. निक्कीनं बॉलीवूड दिग्दर्शिका फराह खानच्या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडीओमध्ये याबाबत खुलासा केला.

बॉलीवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खान ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. तिचं स्वत:चं यूट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलद्वारे ती सेलिब्रिटी लोकांच्या घरी जात विविध पदार्थ बनवते. यादरम्यान, त्यांच्याशी संवाद साधते. अशातच फराह निक्की तांबोळीच्या घरी पोहोचली. यावेळी तिथं अरबाजही होता. तेव्हा फराहनं निक्कीला अरबाजबरोबरच्या नात्याबद्दल विचारलं.

यावेळी फराहनं निक्कीला विचारलं की, ‘तुम्ही ‘बिग बॉस मराठी’मध्ये एकमेकांना भेटलात ना?’ त्यावर निक्की म्हणाली, “खरंतर मी ‘बिग बॉस मराठी’मध्ये जाणारच नव्हते, पण झालं काय… मला बॉयफ्रेंड हवा; तरच मी ‘बिग बॉस मराठी’मध्ये जाईन हे ठरवलं होतं आणि मी याबाबत मेकर्सला आधीच सांगितलं होतं. मेकर्सनी माझा हिंदी ‘बिग बॉस’ शो पाहिला होता. तर त्यांना मी ‘बिग बॉस मराठी’मध्ये पाहिजेच होती. मी त्यांना सांगितलं की, ‘मी सिंगल आहे, मी येईन, माझ्या जास्त काही मागण्या नाहीत; पण मला बॉयफ्रेंड म्हणून शोमध्ये एक मुलगा पाहिजे.’ त्यावर ते म्हणाले, ‘तू माइकवर सांगून टाक की तुला बॉयफ्रेंड पाहिजे.’ मला चांगला मुलगा मिळाला नाही तर पुढचं पुढे बघू. पण, माझा विश्वास होता की मला बॉयफ्रेंड भेटणारच आणि तो भेटला.”

यानंतर निक्की सांगते, “शोमध्ये एन्ट्री करायच्या आधी अरबाजला बघून मला स्टेजवरच Love At First Sight झालं. सगळे प्रेक्षक बघत होते आणि त्याला बघून मला मनापासून वाटलं की, अरबाज माझा बॉयफ्रेंड व्हावा. ‘बिग बॉस मराठी’ शोआधी आम्ही एकमेकांना ओळखतच नव्हतो. पण, मग मी सोशल मीडियावर जाऊन अरबाजबद्दल माहिती काढली, तेव्हा त्याने मला २०२१ मध्ये केलेला मेसेज दिसला.”

यानंतर अरबाज म्हणाला की, “मी निक्कीला २०२१ मध्ये इन्स्टाग्रामवर मेसेज केला होता. पण, त्यानंतर मी त्याकडे काही लक्ष दिलं नाही. मग आम्ही थेट ‘बिग बॉस मराठी’मध्ये एकत्र आलो, तेव्हा बॅकस्टेजला असताना मला निक्कीचा आवाज आला आणि मी तिला आवाजावरूनच ओळखलं. तेव्हा बघितलं तर तिच्या हातात ‘बिग बॉस’च्या घरात घेऊन जायची नेमप्लेट होती. तेव्हा मला कळलं की, हीसुद्धा ‘बिग बॉस मराठी’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे, त्यानंतर आम्ही अजून एकत्र आहोत.”

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ५’नंतर निक्की आणि अरबाजनं रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला. निक्कीनं मास्टरशेफ हा रिअ‍ॅलिटी शो केला, तर अरबाजनं Rise And Fall या शोमध्ये सहभाग घेतला होता. दोघे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. दोघे एकमेकांबरोबरचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात रहात असतात.