Pranit More Team Clarifies His Criticism :’बिग बॉस १९’च्या प्रवासाला आता एकूण ८० दिवस पूर्ण झाले आहेत. गेल्या काही दिवसांत शोमध्ये अनेक ट्विस्ट आले. त्यामुळे प्रेक्षकांनाच नव्हे, तर घरातील स्पर्धकांनासुद्धा अनेक धक्के बसले आहेत. अशातच शोमध्ये गेल्या आठवड्यात सर्वांना एक धक्का बसला, तो म्हणजे नीलम गिरी व अभिषेक बजाज यांच्या एलिमिनेशनचा.

‘बिग बॉस’च्या नुकत्याच झालेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये नीलम आणि अभिषेक दोघे बाहेर पडले. त्यापैकी अभिषेकचं घरातून बाहेर पडणं अनेकांच्या जिव्हारी लागलं आहे. त्याच्या चाहत्यांनी याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. अभिषेक आणि नीलम यांच्या घरातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेत प्रणितचा निर्णय महत्त्वाचा होता. प्रणितला अशनूर, नीलम व अभिषेक या तीन नॉमिनेटेड स्पर्धकांपैकी एका स्पर्धकाला वाचवायचं होतं. त्यासाठी जो स्पर्धक शोमध्ये जास्त योगदान देतो, त्याला वाचवायचं – असा निकष होता.

प्रणितचा हा अभिषेक आणि नीलमला घराबाहेर काढण्याचा निर्णय काहींना पटला आहे; तर काही जण मात्र या निर्णयानं नाराज झाले आहेत. अशातच सोमवारच्या भागात प्रणितनं अभिषेकच्या एविक्शनबाबत केलेल्या टिप्पणीनंतर सोशल मीडियावर त्याच्यावर काही प्रमाणात टीका होत आहे. या टीकेवर आता प्रणितच्या टीमकडून स्पष्टीकरण आलं आहे.

प्रणितनं अभिषेक बजाजच्या एविक्शनबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) टीमनं स्पष्टीकरण देत म्हटलंय, “प्रणितकडे कधीच कोणाला घराबाहेर काढण्याची ताकद नव्हती. तो फक्त आपल्या एका मित्राला वाचवू शकला आणि त्यानं ते मनापासून केलं. तो नेहमी मनापासून खेळला, आपल्या माणसांशी प्रामाणिक राहिला. तो कधीच कुणाविरुद्ध काही खेळला नाही. तो कधीच कुठलाही खेळ ‘स्ट्रॅटेजी’ करून खेळला नाही. पण, जेव्हा असा कठीण निर्णय घेण्याची वेळ आली, तेव्हा तोही आतून तुटला. त्याक्षणी प्रणितनं जो निर्णय घेतला, तो कधीच कुणासाठीही न्याय्य ठरू शकला नसता. पण, प्रत्येक दिवस काहीतरी शिकवतो आणि प्रत्येक निर्णय एक नवीन धडा शिकवतो. हा पराभव फक्त इतरांचा नाही; तो प्रणितचाही आहे.”

दरम्यान, लवकरच आता ‘बिग बॉस’चा प्रवास संपणार आहे. येत्या ७ डिसेंबर रोजी ‘बिग बॉस १९’ हा शो संपण्याची शक्यता आहे. हा शो आणखी पुढे वाढवला जाऊ शकतो, अशी चर्चा होती. मात्र, आपल्या नियोजित वेळेतच ‘बिग बॉस १९’चा महाअंतिम सोहळा पार पडेल. त्यामुळे आता शोच्या अंतिम भागापर्यंत कोण कोण जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.