Rubina Dilaik Abhinav Shukla Death Threat: अभिनेत्री रुबीना दिलैक सध्या तिच्या व असिम रियाजच्या वादामुळे चर्चेत आली आहे. या वादामुळे रुबीनाच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. रुबीनाचा पती अभिनव शुक्लाने यासंदर्भात पोस्ट केली आहे.

‘बॅटलग्राउंड’ नावाच्या शोमध्ये रुबीना दिलैक व असिम रियाज यांच्यात वाद झाला. एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर असिमचे चाहते त्याची बाजू घेत रुबीना व तिच्या कुटुंबियांना लक्ष्य करत आहेत. एकाने एक्सवर पोस्ट करून रुबीनाचा पती अभिनवला धमकी दिली. तसेच त्याने स्वतःला लॉरेन्स बिश्नोईचा माणूस असल्याचं म्हटलं आहे.

अभिनव शुक्लाला जीवे मारण्याची धमकी

अभिनव शुक्लाने त्याच्या एक्स अकाउंटवर शेअर केलेल्या स्क्रीनशॉट आणि व्हिडिओनुसार, त्याला अंकुश गुप्ता नावाच्या प्रोफाइलवरून धमकीचे मेसेज पाठवण्यात आले होते. “मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस आहे. मला तुझा पत्ता माहीत आहे, मी येऊन गोळी झाडू का? ज्याप्रमाणे मी सलमान खानच्या घरावर गोळी झाडली, त्याचप्रमाणे मी तुझ्या घरी येऊन तुला एके-47 ने गोळी घालेन,” असं त्या मेसेजमध्ये लिहिलं आहे.

“ही शेवटची वॉर्निंग आहे. असीमबद्दल काहीही बोलल्यास या यादीत तुझंही नाव असेल. लॉरेन्स बिश्नोई असीमच्या पाठीशी आहे,” असं धमकी देणाऱ्याने लिहिलं होतं. अभिनव शुक्लाने जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलचा स्क्रीन रेकॉर्ड केलेला व्हिडिओही शेअर केला असून ती व्यक्ती चंदीगड येथील असल्याचं वाटतंय असं लिहिलं.

abhinav shukla
अभिनव शुक्लाची पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

अभिनवने पोलिसांकडे मागितली मदत

अभिनवने यासंदर्भात स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये त्याने पंजाब व चंदीगढ पोलिसांना टॅग करत लिहिलं, “माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या. डीजीपी पंजाब पोलीस, चंडीगढ पोलीस ही व्यक्ती चंदीगढ किंवा मोहालीची वाटत आहे. कृपया लगेच आणि कठोर कारवाई करा. कोणी या व्यक्तीची ओळख पटवू शकत असेल तर प्लीज रिपोर्ट करा.”

अभिनवला आलेल्या धमकीवर रुबीना म्हणाली…

रुबीना दिलैकनेही तिच्या पतीला मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. असीमच्या चाहत्याच्या धमकीच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं, “मी शांत आहे, ही माझी कमजोरी नाही. माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नका.”