Sankarshan Karahade shares post: अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा सध्या ‘आम्ही सारे खवय्ये’या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असल्याचे दिसत आहे. या कार्यक्रमात मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांच्या जोड्या हजेरी लावतात.
कलाकारांची लव्हस्टोरी, त्यांच्या आयुष्यातील चांगले वाईट प्रसंग याबाबत गप्पा मारल्या जातात. तसेच काही गमतीशीर खेळदेखील खेळले जातात. हे कलाकार त्यांचा एखादा आवडता पदार्थ बनवतात. पुन्हा एकदा या मंचावर त्यांच्या मनातील भावना जोडीदारासमोर व्यक्त करतात. संकर्षण अगदी सहजतेने त्यांना बोलते करतो.
याबरोबरच अभिनेता सध्या त्याच्या ‘कुटुंब किर्रतन’ या नाटकामुळेदेखील चर्चेत आहे. या नाटकाला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. या नाटकाचा नुकताच १०० वा प्रयोग पार पडला. संकर्षण कऱ्हाडे वेळोवेळी नाटकाबद्दल, तसेच त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल, प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमळ कौतुकाबद्दल सोशल मीडियावर व्यक्त होत असतो.
संकर्षण कऱ्हाडे म्हणाला….
आता संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही खास पोस्ट प्रशांत दामले यांच्यासाठी आहे. संकर्षणने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये संकर्षण त्याच्या कारमध्ये असल्याचे दिसते; तर काहीच अंतरावर असलेल्या दुसऱ्या गाडीत प्रशांत दामले दिसत आहेत. ते हात दाखवत असल्याचे फोटोमध्ये पाहायला मिळते.
हा फोटो शेअर करताना संकर्षण कऱ्हाडेने लिहिले, “ओळखा पाहू, पलीकडच्या गाडीत कोण आहे? आज पुण्यात आमची अशी भेट झाली.”
पुढे त्याने लिहिले, “मी दामले सरांना म्हणालो की थोडा वेळ काढा आणि तुमचीच निर्मिती असलेल्या माझ्या नाटकाला या की हो. त्यावर आमचे दामले सर त्यांच्याच स्टाईलने म्हणाले की, जोपर्यंत लोक येतायेत तोपर्यंत मी नाही आलो तरी चालेल.”
नेटकरी म्हणाले…
आता संकर्षणने शेअर केलेल्या या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नेटकऱ्यांनी प्रशांत दामलेंच्या उत्तराचे कौतुक केल्याचे दिसत आहे. “वाह! काय उत्तर आहे”, “आम्ही दोघे खवय्ये”, “वाह, प्रशांत सर”, “काय उत्तर आहे!”, “किती छान”, “गुरुजी करेक्ट बोलताहेत”, “हा त्यांचा संकर्षणवरचा विश्वास बोलत आहे.” “रंगभूमीवरचे सर्वेसर्वा प्रशांत दामले”, अशा कमेंट पाहायला मिळत आहे.





दरम्यान, ‘कुटुंब किर्रतन’ या नाटकाची निर्मिती प्रशांत दामलेंनी केली आहे.
